‘अबकारी धोरण प्रकरणात गुन्ह्याच्या कथित रकमेसंदर्भात केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील मोबाइल संभाषण सापडले आहे. केजरीवाल यांनी त्यांच्या मोबाइलचा व संगणकाचा पासवर्ड देण्यास नकार दिल्यानंतर हवाला ऑपरेटरच्या उपकरणांमधून हे संभाषण पुनर्प्राप्त करण्यात आले आहे’, असे ‘ईडी’ने न्यायालयात सांगितले.
या प्रकरणी ‘ईडी’ने २१ मार्च रोजी अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिल्याने केजरीवाल हे सध्या तुरुंगाबाहेर आहेत. निवडणूक प्रचारासाठी केजरीवाल यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
‘केजरीवाल सप्ततारांकित हॉटेलमध्ये राहिल्याचा थेट पुरावा आमच्याकडे आहे. मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील एका आरोपीने त्यांचे हॉटेलचे बिल अंशतः भरले होते’, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी न्यायालयाला सांगितले. दिल्लीचे हे उत्पादन शुल्क धोरण आता रद्द करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक या नात्याने केजरीवाल या कथित घोटाळ्यासाठी अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे.
मालीवाल प्रकरणामुळे
पक्ष अडचणीत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ‘आप’च्या खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी केजरीवाल यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विभव कुमार हे कारवाईच्या कचाट्यात सापडण्याचे संकेत आहेत. विभव कुमार यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालीवाल प्रकरणामुळे ‘आप’च्या अडचणी वाढल्या आहेत.