यात एमडीएच कंपनीच्या मद्रास करी पावडर, सांभार मिक्स्ड मसाला पावडर, मिक्स्ड मसाला करी पावडर आणि एव्हरेस्ट कंपनीच्या फिश करी मसाला पावडरचा समावेश आहे. या चारही मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साइडचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याने त्यांच्या आयातीवर व विक्रीवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आले आहे, असे नेपाळच्या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने काढलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
बाजारातील या मसाले उत्पादनांच्या निकृष्ट दर्जाबाबत आणि ते सेवनासाठी घातक असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही याची गंभीरपणे नोंद घेतली, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. नेपाळच्या अन्नपदार्थ गुणवत्ता नियंत्रण विभागानेही देशातील आयातदारांना आणि व्यापाऱ्यांना ही उत्पादने बाजारातून मागे घ्यावीत, अशा सूचना केल्या आहेत.
गेल्याच महिन्यात सिंगापूर आणि हाँगकाँगनेही एमडीएच आणि एव्हरेस्टच्या मसाल्यांमध्ये कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या ईटीओचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे सांगत या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी आणली होती. त्यानंतर भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके विभागाने (एफएसएसएआय) देशातील विविध कंपन्यांच्या मसाल्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता तपासण्यास सुरुवात केली होती.
४० टक्के निर्यात घटण्याची भीती
मसाल्यांमध्ये इथिलिन ऑक्साइडचा अंश असल्याच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास या आर्थिक वर्षात भारतीय मसाल्यांच्या निर्यातीत ४० टक्के घट होण्याची भीती शुक्रवारीच फेडरेशन ऑफ इंडियन स्पाइस स्टेकहोल्डर्सनी व्यक्त केली होती. जगातील आघाडीच्या मसाल्यांच्या उत्पादकांमध्ये भारताचा समावेश होतो. ‘स्पाइस बोर्ड इंडिया’च्या आकडेवारीनुसार, सन २०२१-२२मध्ये भारताने जगभरातील १८० देशांना चार अब्ज अमेरिकी डॉलर किमतीचे सुमारे २००हून अधिक मसाले आणि संबंधित अन्य उत्पादनांची निर्यात केली होती.