Mata Ground Report: पश्चिम बंगालच्या मैदानात ‘बी’ टीम कोण? मतदारांचे बारकाईने लक्ष

विजय महाले, सॉल्ट लेक (कोलकाता) : लोकसभा निवडणुकीत मतविभाजनाची भीती भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्हीही पक्षांना सतावू लागली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि डावी आघाडी ही ‘बी टीम’ असल्याचा आरोप हे दोन्ही पक्ष करीत आहेत. मात्र, राज्यात भाजप आणि ममतादीदी यांच्यात मिलिभगत असल्याचे प्रत्युत्तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिले आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मतदार मात्र याकडे अधिक बारकाईने बघताना दिसतो.कोलकत्यातील बी. बी. गांगुली मार्गावरून रेल्वेस्टेशनकडे जाताना डावीकडे न्यू बाव बाजार आहे. तिकडे वळाले, की रस्ता संपताच बंगाबासी महाविद्यालय लागते. त्याच्यासमोर फुटबॉलचे मैदान आहे. शेजारी उद्यान, भोवताली जॉगिंग ट्रॅक, पलिकडे एक-दोन मंदिरे. अर्जेटिनाचा टी शर्ट घातलेला रघू ब्राझीलची जर्सी असलेल्या खेळाडूकडे फुटबॉल पास करतो. पण थोडक्यात बॉल निसटला आणि गोल करायची संधी हुकली. टाळ्या देणारे क्रीडाप्रेमी मात्र निराश झाले. डोळ्यांवर चष्मा असलेल्या चाळीशीतील हाजरा याने खेळाडूंकडे बघत बंगाली भाषेत शिव्या हासडल्या. ‘‘ये पिली टी-शर्टवाला अच्छा खेल रहा है ना!’’ असे विचारल्यावर हाजरा याने डावा डोळा बारीक करीत नकारार्थी मान हलविली. ‘‘ये साला, क्या खेल रहा है? जर्सी पेहन लिया मतलब क्या हुआ? फुसका माल है! ये मैदान का नही दिमाख का खेला होबे!’’ उजव्या भुवईच्या वर दर्शनी बोट ठेवून हाजराने सांगितले. त्यावर ‘खेला होब्बे, अब तो इलेक्शन का भी माहौल है ना!’ असं हसत त्याला विचारलं. स्मित हास्य देत तो दूरवर मैदानाकडे बघायला लागला. ‘‘क्या लगता है, बीजेपी जादा गोल करेगी?’’ खांदे उंचावत ‘‘कुछ केह नही सकते दादा! ममता चाहती तो बीजेपी खडी भी नही रेह पाती वेस्ट बेंगॉल में’’ ‘‘मतलब?’’ ‘‘ओ दादा, बीजेपी मे अब मेन कौन है? शुभेंदू. वो किसका आदमी था? दीदीने उसको बडा किया. अब बीजेपी मे चला गया’’ हाजराच्या बोलण्याचा अर्थ असा होता, की दीदींनीच भाजपला मोठे केलंय. भाजप हिंदू-मुस्लिम करते. दीदीला पण तेच हवयं! तिची मुस्लिम वोट बँक वाढतय. म्हणजे भाजप ही ‘तृणमूल’साठी ‘बी टीम’ म्हणून काम करतेय, असं हाजरा पटवून देतो.
Shantigiri Maharaj : जय बाबाजीच्या चिठ्ठ्या वाटल्या, शांतिगिरींचा सहकारी ताब्यात; महाराजांनी पोलिसांना विचारला जाब

कोलकात्याहून सॉल्ट लेककडे जाण्यासाठी मेट्रोची वाट पाहणारा दीपेश काँग्रेस-डाव्या आघाडीवरच शंका घेतो. शून्य खासदार असणाऱ्या पक्षाकडे इतकी मोठी ताकद कुठून आली? राज्यात भाजपच्या जागा वाढू नये म्हणून डाव्यांना कोणी पुढे केलय का? या मागे ममतादीदी तर नाही ना?, अशी शंका तो उपस्थित करतो. ‘तृणमूल’ला त्यांची वोट बँक सांभाळून दुसऱ्यांच्या मतांमध्ये विभाजन करायचे आहे, असे सांगणाऱ्या दीपेशला डावी आघाडीच ‘तृणमूल’ची बी टीम वाटते.

पूर्ण सहकार्याची हमी काय?

राज्यात डाव्यांना सत्तेतून बाहेर खेचण्यासाठीच काँग्रेसनेच ‘तृणमूल’ला मोठे केले. मात्र, ममतादीदी काँग्रेसऐवजी भाजपला साथ देत आहेत, असे मेडिकल स्टोअर्सवाल्या माधव यांना वाटते. ‘‘डाव्या पक्षांनी अणू कराराच्या मुद्द्यावरून केंद्रातील तत्कालीन यूपीए-१ चे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी डाव्यांनी ‘घोडचूक’ केलीय असे वक्तव्य त्यावेळचे केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांनी केले होते’’, अशी आठवण ते सांगतात. ‘त्यानंतर राज्यात ममता बॅनर्जींचा उदय झाला. डाव्यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे खून केले आहेत. आता डाव्यांना काँग्रेस लोकसभेसाठी पूर्ण सहकार्य करतील, याची कोणतीच हमी नाही.’ त्यामुळे काँग्रेस डाव्यांविरोधात ‘बी टीम’ म्हणून काम करतेय का?’ अशी शंका ते उपस्थित करतात. उलुबेरियामध्ये ‘तृणमूल’च्या उमेदवार मिताली बाग यांच्याविरोधात भाजपने प्रतिस्पर्धी ‘माकप’कडेच मदत मागितल्याची चर्चा आहे.

‘अब काम दिखाना होगा!’

सर्व राजकीय तर्कवितर्कांमध्ये पाचवी पास आणि बांधकाम पर्यवेक्षक फिरोज याचे बोल वेगळे आहे. ‘‘भाजपने देशाची निराशा केली आहे. ममता लखिर भंडार योजना देताय पण राज्यात पेट्रोल, डिझेल एक रुपयाने सुद्धा त्यांनी स्वस्त केले नाही. हे तर त्यांना शक्य होते ना? राज्यात काँग्रेस-डावी आघाडी चांगला पर्याय होऊ शकते. पण त्यांना काम दाखवावे लागेल’’, असे तो स्पष्ट करतो.

Source link

bjpkolkatamamata banerjeeTrinamool Congressकोलकातातृणमूल काँग्रेसभाजपममता बॅनर्जी
Comments (0)
Add Comment