‘भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त आहेत,’ अशी मुक्ताफळे पात्रा यांनी उधळली होती. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी पात्रा यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडले. सोमवारी दुपारी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास पात्रा यांना मध्यरात्रीचा एक का वाजला, असा प्रश्नही केला जात आहे. ‘आपली जीभ घसरल्या’चे मान्य करताना, त्याला मुद्दा बनवू नका, असे पात्रा म्हणाले.
ओडिशात लोकसभेच्या सहा जागांवर शनिवार, २५ मे रोजी मतदान होणार आहे. यात पुरी व राजधानी भुवनेश्वरसह केओंझार, ढेंकनाल, कटक या जागांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे संबलपूरमधून, तर स्वतः पात्रा पुरीमधून निवडणूक लढवत आहेत. तर अंतिम सहा जागांसाठी १ जून रोजी, सातव्या टप्प्यात मतदान होईल. यात मयूरभंज, बालासोर, भद्रक, जाजपूर, केंद्रापाडा व जगतसिंगपूर यांचा समावेश आहे. भाजपचे उपाध्यक्ष जय पांडा केंद्रापाडा येथून निवडणूक लढवत आहेत.
हे पाप ओडिशाची जनता विसरणार नाही, नवीन पटनायक यांचा इशारा
संबित पात्रा यांच्या विधानावर, ‘महाप्रभूंना कोणत्याही मानवाचा भक्त म्हणणे हा ईश्वराचा अपमान आहे. हे पाप ओडिशाची जनता विसरणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिला. तर ‘सत्तेच्या नशेतील भाजप आमच्या देवांनाही सोडत नाही. पण ४ जून रोजी जनता यांचा अहंकार संपवेल. पात्रा यांच्या विधानामुळे जगभरातील कोट्यवधी जगन्नाथभक्त आणि ओडियांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे,’ असा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
२०१९मध्येही अशीच चूक
भगवान जगन्नाथाबाबत केलेली चूक पात्रा यांना याच पुरी मतदारसंघात २०१९मध्येही भोवली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पात्रा यांनी जगन्नाथाच्या मूर्तीसोबत रोड शो केला होता. पात्रा यांनी राजकीय फायद्यासाठी भगवान जगन्नाथाचा वापर केला, हे ओडिशाच्या संस्कृतीच्या विरोधात आहे, अशी तक्रार त्यांच्याविरोधात दाखल झाली होती.
राहुल गांधी यांची सडकून टीका
जेव्हा पंतप्रधान स्वतःला सम्राट मानू लागतात आणि दरबारी त्यांना देव मानू लागतात, तेव्हा पापाच्या लंकेचे पतन जवळ आले आहे, असा त्याचा अर्थ स्पष्ट होतो. हा अहंकारच त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरेल- राहुल गांधी, काँग्रेस नेते