गेल्या १० वर्षांमध्ये महागाई आणि बेरोजगारी वाढली असल्याच्या विरोधकांच्या आरोपाचाही पंतप्रधान मोदी यांनी या विशेष मुलाखतीत सविस्तर समाचार घेतला. ‘यूपीएच्या काळात महागाईचा दर दुहेरी अंकात असायचा. सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात युद्धाची परिस्थिती आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर झाला आहे. तरीही आमच्या सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ होऊ दिली नाही. गेल्या १० वर्षांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. लाखो तरुणांना सरकारी नोकरी मिळाली आहे. खासगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत’, असे मोदी यांनी सांगितले.
डीपफेक आणि कृत्रिम प्रज्ञा या तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगावर पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खोट्या बातम्या आणि कपोलकल्पित घटनांशी काहीही संबंध नाही’, असे ते म्हणाले. आपले सरकार आल्यास काहीही झाले तरी ठरलेल्या वेळेत महिला आरक्षण लागू होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
वाराणसीच्या आपल्या खासदारकीच्या कार्यकाळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘इथे प्रत्येक काम केवळ गंगामातेच्या आशीर्वादानेच फलदायी ठरते. १० वर्षांपूर्वी जेव्हा मी म्हणालो होतो की, गंगामातेने मला बोलावले आहे, तेव्हा मी ते त्याच भावनेने सांगितले होते.’ आता गंगामातेने आपल्याला दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘उत्तर प्रदेशातील पूर्वांचल हे सुरुवातीला दुर्लक्षित होते. काँग्रेस सरकारच्या काळात पूर्वांचलची जनता अशा सुविधा मिळण्याचा विचारही करीत नव्हती. कारण वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांमध्येच लोकांना अडकवून ठेवण्यात आले होते. पूर्वांचलमधून त्यांचे मुख्यमंत्री निवडून आले तेव्हाही हीच परिस्थिती होती. त्याकाळी फक्त नेत्यांची हेलिकॉप्टर पूर्वांचलमध्ये उतरायची, आज विकास जमिनीवर पोहोचला आहे’, या शब्दांत मोदी यांनी काँग्रेस राजवटीवर टीका केली.