आता मोदी नव्हे, NDA सरकार; दिल्लीत हालचाली जोरदार; सूत्रं हलली, शपथविधीची तारीख ठरली?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी झालेल्या आहेत. पण भाजपप्रणीत एनडीएनं बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. एनडीएचं संख्याबळ २९४ आहे. त्यामुळे भाजपनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली असल्याचं कळतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जूनच्या संध्याकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. त्यासाठीची तयारी सुरु झाली आहे.

नव्या मंत्रिमंडळात कोणत्या चेहऱ्यांना संधी द्यायची यासाठी मित्रपक्षांसोबत भाजपची चर्चा सुरु आहे. बैठकांचं सत्र सुरु आहे. दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळातील खासदारांची नावं निश्चित होतील. मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नावे ऐतिहासिक विक्रमाची नोंद होईल. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे ते दुसरे नेते ठरतील. याआधी अशी किमया पंडित जवाहरलाल नेहरुंना साधता आली आहे. मोदी त्यांच्या विक्रमाची बरोबरी करतील.
Lok Sabha Election 2024 Result: पराभवाचं खापर, सर्व्हेंचा वापर; लोकसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानंतर महायुतीत धुसफूस
दिल्लीत आज संध्याकाळी ४ वाजता एनडीएची बैठक होत आहे. या बैठकीला जदयुचे अध्यक्ष नितीश कुमार, टिडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यासह अन्य नेते उपस्थित असतील. एनडीएच्या मित्रपक्षांची बैठक झाल्यानंतर भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होईल. त्यात सरकार स्थापना आणि शपथविधीच्या रुपरेषेविषयी चर्चा करण्यात येईल. नितीश कुमार आज सकाळी दिल्लीला पोहोचले आहेत, तर चंद्रबाबू नायडू थोड्याच वेळात दिल्लीला पोहोचतील.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ३०३ जागा जिंकल्या. त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली. त्यामुळे मंत्रिमंडळात जवळपास सगळेच खासदार भाजपचे होते. पण आता भाजपला बहुमतासाठी ३२ जागा कमी पडत आहेत. त्यामुळे १६ जागा जिंकणाऱ्या टिडीपी आणि १२ जागा जिंकणाऱ्या जेडीयुचा भाव वधारला आहे. भाजपला पाठिंबा देण्याच्या बदल्यात दोन्ही पक्ष महत्त्वाची मंत्रिपदं मागू शकतात.

Source link

bjpNDAPM Modiswearing in ceremonyएनडीएपंतप्रधान मोदीभाजपशपथविधी
Comments (0)
Add Comment