सार्वत्रिक लोकसभा निवडणूक निकालात इंडिया आघाडीने नेत्रदीपक यश मिळवून भाजपचा विजयी वारू रोखला. ज्या उत्तर प्रदेशकडून भाजपला सर्वाधिक अपेक्षा होत्या, तिथेच समाजवादी पक्षाने भाजपला धक्का देऊन सर्व स्वप्ने धुळीस मिळवली. अगदी राममंदिराचा कोणताही परिणाम उत्तर प्रदेशमध्ये झाला नाही. देशभरात इंडिया आघाडीने जवळपास २३५ जागा जिंकल्या आहेत. या सगळ्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा स्पष्ट केली.
देशाने आज परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलेय
राहुल म्हणाले, “मोदी-शाहा यांनी देश चालवू नये, ही जनतेची इच्छा आहे. आजच्या निकालातून तेच स्पष्ट झालेय. आम्ही कोणत्याही पक्षाविरोधात लढत नव्हतो तर संस्थांविरोधात आम्ही दोन हात करत होतो. संविधान वाचविण्याची आमची लढाई होती. देशाने आज परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलेय”
जनतेने मोदी शहांना नाकारल्यानंतर इंडिया आघाडी आता दिलेली आश्वासने पूर्ण करेन
“इंडिया आघाडीच्या वाट्याला आलेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि सहकारी पक्षाच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या अफाट मेहनतीचे यश आहे. निवडणूक काळात त्यांनी केलेल्या मेहनतीचे चीज झाले. जनतेने मोदी शहांना नाकारल्यानंतर इंडिया आघाडी आता जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करेन”, असे राहुल गांधी म्हणाले.