सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातील तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले राममोहन नायडू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. टीडीपीला मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळावी यासाठी आशा लावून बसले आहेत. तर, दोन राज्यमंत्री पदंही त्यांना देण्यात येणार आहे. मात्र, टीडीपी पक्षाने दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदांची मागणी केली आहे. याशिवाय, उपसभापतीपदाचीही डिमांड ठेवली जाण्याची शक्यता आहे.
एनडीएतील आणखी एक महत्त्वाचा मित्रपक्ष म्हणजे जनता दल यूनायटेडही यावेळी संधी साधण्याच्या तयारीत आहे. जेडीयूचेही अनेकजण मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्यापैकी ललन सिंह आणि केसी त्यागी यांचं नाव चर्चेत आहे. मात्र, जेडीयूच्या कोट्यातून कोण मंत्री होणार याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हातात आहे. नितीशकुमार यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा वाटा हवा आहे, हे त्यांच्या निर्णयांवरुन दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी एनडीएच्या बैठकीत याबाबतचा फॉर्म्युलाही मांडला. त्यानुसार, त्यांना प्रत्येक ४ खासदारांमागे एक मंत्रीपद हवं आहे. जेडीयूला १२ जागा मिळाल्या आहेत. नितीश कुमारांच्या प्रस्तावानुसार, ते ३ मंत्रिपदांची मागणी करू शकतात.
त्याचप्रमाणे बिहारमधून एनडीएमध्ये असलेले चिराग पासवान आणि जीतन राम मांझी हे देखील उद्या शपथ घेऊ शकतात, अशी माहिती आहे. उत्तर प्रदेशात अपना दलाच्या अनुप्रिया पटेलही शपथ घेऊ शकतात. त्याचबरोबर आंध्र प्रदेशातील पवन कल्याण यांना मिळालेले महत्त्व पाहता तेही मंत्री होणार असल्याची शक्यता आहे.
तर, यावेळी भाजपच्या मंत्र्यांची संख्या कमी होणार हे निश्चित आहे. भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश असणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, पीयूष गोयल, हरदीप सिंग पुरी, अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, प्रल्हाद जोशी आणि मनसुख मांडविया हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. आता मोंदींच्या मंत्रिमंडळात नेमकी कोणाकोणाची वर्णी लागते आणि कोणाला आऊट केलं जातं हे लवकरच स्पष्ट होणार आहे.