माझ्यासमोर धर्मसंकट, कुणाची निवड करू?
वायनाडच्या जनेतने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. सलग दुसऱ्यांदा मला येथील जनतेने निवडून दिले. त्यांचे मी आभार मानतो. पण आता माझ्यासमोर धर्मसंकट उभे ठाकले आहे. मी कुणाची निवड करू? रायबरेली की वायनाड? असा प्रश्न राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेला विचारला. त्यावर स्टेजसमोरील जनतेने उस्फूर्तपणे ‘वायनाडची निवड करा’, असे सांगितले. लोकांचा कौल ऐकून राहुल यांनी स्मितहास्य करून त्यांच्या भावनांचा आदर केला. मी तुम्हाला नाराज करणार नाही, तुम्हाला आनंद होईल असाच निर्णय मी घेईन, असे ते म्हणाले.
आम्ही द्वेषाला प्रेमाने हरविले, विनम्रतेने अहंकाराला पराजयाची धूळ चारली
राहुल गांधी भाषणात म्हणाले, या निवडणुकीत द्वेषाला आम्ही प्रेमाने हरविले आहे. विनम्रतेने अहंकाराला पराजयाची धूळ चारली. पंतप्रधान वाराणसीतूनही हरले असते, पण ते थोडक्यात बचावले. अयोध्येमध्येही भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले कारण तेथील जनतेनेही हिंसा आणि द्वेषाला साफ नाकारले. दिल्लीत बनलेले सरकार अपंग आहे. विरोधी पक्षांनी भाजपला मोठा झटका दिलाय. तुम्ही बघा नरेंद्र मोदींची सगळी कार्यशैली बदलून जाईल. कारण भारताच्या जनतेने आम्हाला गृहित धरू नका, असा संदेश दिला आहे.
राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी, असा आग्रह काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांसह कार्यकारिणीच्या सदस्यांनी रविवारी धरला. यावर मी लवकरच निर्णय घेईन, असे राहुल यांनी स्पष्ट केले.