केरळमधील २३, तमिळनाडूमधील सात आणि कर्नाटकातील एक अशा ३१ श्रमिकांचे मृतदेह कोची विमानतळावर प्रशासनाने स्वीकारले. केरळ पोलिसांनी या मृतांना मानवंदना दिली. औपचारिक कार्यक्रमानंतर हे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. रुग्णवाहिकांतून मूळ गावी मृतदेह नेले जात असताना केरळ पोलिसही त्यांच्यासोबत होता. तमिळनाडूमधील श्रमिकांच्या मृतदेहांच्या रुग्णवाहिकांसोबत राज्याच्या सीमेपर्यंत केरळ पोलिसांनी सोबत केली. उर्वरित १४ मृतदेह देशांतर्गत विमानाने दिल्लीला रवाना करण्यात आले.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह या विमानाबरोबर दाखल झाले. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी, राज्यातील मंत्री के. राजन, पी. राजीव, वीणा जॉर्ज, कडनपल्ली रामचंद्रन, रोशी ऑगस्टीन, विरोधी पक्ष नेते व्ही. डी. सतीशन यांच्यासह अनेक खासदार व आमदार यांनी यावेळी विमानतळावर उपस्थित राहून मृतांना आदरांजली वाहिली.
दुहेरी आघात
चेंगन्नूर येथील कुंटुंबासाठी ही आग म्हणजे दुहेरी आघात ठरला. कुवेतमधील कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत असलेला शिबू वर्गीस (३०) आणि त्याचे काका मॅथ्यू थॉमस (५३) या दोघांचे या आगीत निधन झाले. शिबू याच्या पश्चात पत्नी आणि लहान मुलगा आहे.
मंत्र्यांना परवानगी नाकारल्याने वाद
तिरुनंतपुरम : कुवेत आगीनंतर मदत कार्यात समन्वय साधण्यासाठी कुवेतला जाण्यास केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांना केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याचे शुक्रवारी तीव्र पडसाद उमटले. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन; तसेच राज्यातील विरोधी पक्ष काँग्रेसने यावरून केंद्र सरकारवर टीका केली.
आणखी एका भारतीयाचा मृत्यू
कुवेत सिटी : कुवेतमधील भीषण आगीत होरपळलेल्या आणखी एका भारतीयाचा उपचारांदरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत जीव गमावलेल्या भारतीयांची संख्या ४६ वर गेली. या आगीत ५० जण मृत्युमुखी पडले असून, बहुतेकांचा मृत्यू धुरामुळे श्वास कोंडल्याने झाला.