अधिकाऱ्यांना सवाल, इतकं बजेट देणं किती योग्य?
कुमारस्वामी मोदी सरकार ३.० मध्ये मंत्री झाल्यानंतर शुक्रवारी बेंगळुरूमध्ये पोहोचले होते. त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं, की नव्या उत्पादन यूनिटद्वारे जवळपास ५ हजार नोकऱ्या निर्माण होतील. त्यासाठी आपण त्यांना २ अब्ज डॉलर्सची सबसिडी देत आहोत. हे कंपनीच्या एकूण गुंतवणुकीच्या ७० टक्के आहे. यावर बोलताना कुमारस्वामी यांनी अधिकाऱ्यांना त्यांना इतकं बजेट देणं किती योग्य आहे, असा सवाल केला.
पुढे ते म्हणाले, दुसरीकडे छोटे उद्योग आहेत. उदाहरणार्थ, पीनेया (बेंगळुरूमधील औद्योगिक क्षेत्र) इथे छोटे उद्योग आहेत. त्यांनी किती लाख रोजगार निर्माण केले? आपण त्यांना कोणते फायदे दिले आहेत? देशाच्या संपत्तीचे रक्षण कसं करता येईल याचा विचार मी करतो आहे.
तरुणांना रोजगार देण्यावर भर असणार
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रालय एचडी कुमारस्वामी यांच्याकडे सोपावण्यात आलं. मंत्रीपद मिळाल्यानंतर कुमारस्वामी यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले. रोजगाराबाबत बोलताना ते म्हणाले, देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर असेल. राज्याबाहेरही नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. त्यासाठी दुसऱ्या राज्यात जाण्याची तयारी ठेवावी लागेल.
हमीभाव योजनांसाठी काँग्रेसवर निशाणा
कुमारस्वामी यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या हमीभाव योजनांवरही टीका केली. ते म्हणाले, लोकांना मोफत गोष्टींवर अवलंबून ठेवण्याऐवजी त्यांना रोजगार देऊन आत्मनिर्भर होण्यासाठी चालना देण्यावर त्यांचा विश्वास आहे.