मिळालेल्या माहितीनुसार, शुभलाल सहनी हे मुजफ्फरपूर येथील राहणारे आहेत. शुभलाल मजुरी करुन आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करतात. घरात मोजकी पाच विजेची उपकरणं वापरणारे शुभलाल यांना ३१ लाखांचं वीज बिल आल्याने ते अतिशय चिंतेत असून सतत वीज विभागाकडे फेऱ्या मारत आहेत. इतकंच नाही तर ३१ लाखांचं वीज बिल भरलं नसल्याने त्यांच्या घरातील वीजदेखील कापण्यात आली आहे.
दोन महिन्यांपूर्वी लावलेलं स्मार्ट मीटर
मजुरी करणाऱ्या शुभलाल सहनी यांनी सांगितलं, की त्यांच्या घरच्या विजेच्या बिलाचं कनेक्शन त्यांची पत्नी फूला देवीच्या नावे आहे. दोन महिन्यांपूर्वी वीज विभागाकडून स्मार्ट मीटर लावण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवस घरी वीज होती. मात्र काही दिवसांपासून अचानक वीज कापण्यात आली. त्यानंतर २० जून रोजी ४०० रुपये रिचार्ज केला, तरीही घरात वीज आली नसल्याने वीज विभागात जात पदाधिकाऱ्यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर त्यांच्यावर ३१ लाख रुपयांचं वीज बिल थकीत असल्याचं समोर आलं आहे.
त्याआधी दोन महिने २६०० रुपये बिल आलं होतं. केवळ दोन पंखे आणि तीन बल्बचं बिल २६०० रुपये आल्यानंतरही त्याने ते भरलं होतं. २६०० रुपयांनंतर ३१ लाखांचं बील पाठवण्यात आलं, ते भरलं नसल्याने आता वीज कापण्यात आली आहे.
वीज विभागाने काय सांगितलं?
वीज विभागाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरने दिलेल्या माहितीनुसार, वीज बिलाबाबत तक्रार मिळाली असल्याचं त्याने सांगितलं. तसंच ३१ लाखांचं बिल आलेल्या व्यक्तीकडून लेखी तक्रार मागवण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. तसंच रीडरचीही माहिती घेतली जात आहे. वीज बिलात कधी गोंधळ होतो, मात्र तपासानंतर हे ठिक केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.