समोर आलेल्या माहितीनुसार, वेटिंग तिकीटवर रेल्वेच्या आरक्षित डब्ब्यांमध्ये प्रवास करण्यास रोख लावला जाणार आहे. तुम्ही तिकीट ऑफलाईन पद्धतीने जरी काढले असेल तरी तुम्हाला आरक्षित डब्ब्यात प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्ब्यांमध्ये कन्फर्म तिकीटने प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. तरी वेटिंग तिकीटवर प्रवास करणाऱ्यांना हा मोठा फटका असणार आहे.
रेल्वे अधिकारी सांगतात,
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेटिंग तिकीटांवर प्रवास करण्यावर बंदी आजच लागू होत नाही तर ती ब्रिटिश काळापासूनच लागू आहे. परंतु त्याचे काटेकोरपणे पालन केले गेले नाही. रेल्वेचा स्पष्ट नियम आहे की, जर तुम्ही तिकीट खिडकीतून तिकीट घेतले असेल आणि ते वेटिंग वर असेल तर तुम्ही ते रद्द करून पैसे परत मिळवू शकता, मात्र असे करण्याऐवजी प्रवासी डब्यात चढून सर्रास प्रवास करतात. यावर रोख लागणे गरजेचे आहे. परंतु, प्रवाशांच्या सोयीचा विचार करून सध्या फारसे कठोर नियम बनवले नाहीत.
वेटिंग तिकीटने प्रवास केल्यास पडेल महागात
यापुढे जर वेटिंग तिकीट असलेला प्रवासी आरक्षित डब्ब्यातून प्रवास करताना आढळला, तर त्याला ४४० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो आणि त्याला चालू प्रवासातच बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. याशिवायन अशा प्रवाशांना सामान्य डब्ब्यात हलवण्याचा अधिकारही टीटीला असणार आहे. रेल्वेकडे सुमारे हजारों प्रवाशांच्या तक्रारी वर्ग झाल्या आहेत. आरक्षित डब्ब्यातील प्रवाशांकडून आपली गैरसोय होत असल्याच्या या तक्रारी आहेत. त्यामुळे आरक्षित डब्ब्यातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन नियम कठोर करण्याच्या तयारीत आहे.