वनविभाग टीमने वाचवले पर्यटकांचे प्राण
वनविभागाच्या टीमने मोठ्या दोरीच्या मदतीने पाण्यात फसलेल्या पर्यटकांना बाहेर काढले आहे. यामुळे वन विभाग पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेचा विडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पावसाचा जोर वाढल्याने धबधबा प्रवाहित
समोर आलेल्या माहितीनुसार, रोहतास जिल्ह्याच्या तिलौथू येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. हा धबधबा पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत असतात. दरम्यान तुतला भवानी धबधबा क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु होता. यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला. परिणामी पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे धबधब्यात उतरलेले पर्यटक तेथेच अडकले. एवढ्यात अडकलेले सगळे पर्यटक मदतीसाठी आक्रोश करु लागले. ज्याचा आवाज नजीकच्या लोकांना पोहोचला.
पाण्यातून बाहेर पडताच पर्यटकांनी सोडला निश्वास
लोकांची आरडाओरड ऐकून या घटनेची नजीकच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि आपले बचावकार्य सुरु केले. वन विभागाच्या टीमने एका दोरीची मदत घेऊन पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. एकमेकांच्या हात पकडून एक साखळी तयार करण्यात आली आणि एक एक करुन सर्वांना बाहेर काढले. पाण्यामधून बाहेर येताच लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला पण त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले होते.