घटनास्थळी दुपारी बचावकर्त्यांनी पूर्व नवलपरासी जिल्ह्यातील गैंडाकोट परिसरातून दोन अतिरिक्त मृतदेह बाहेर काढले. अपघातात बेपत्ता झालेले दोघेही मृत नेपाळी नागरिक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ते प्रवासी बीरगंज ते काठमांडूला जाणाऱ्या बसमधील प्रवासी होते. बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकांमध्ये ऋषी पाल शाही शिवाय संतोष ठाकूर, सुरेंद्र साह, आदित मियाँ, सुनील, शाहनवाज आलम आणि अन्सारी यांचा समावेश आहे.
भारतीय नागरिकांसह २४ जणांना घेऊन जाणारी एक बस, बीरगंज ते काठमांडू आणि दुसरी ३० स्थानिक प्रवाशांसह काठमांडूहून गौरला जाणारी बस, मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात वाहून गेली. पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) आणि चितवन जिल्हा पोलीस कार्यालयाचे प्रवक्ते भेष राज रिजाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भारतीय नागरिक काठमांडूहून गौर येथे जात असलेल्या बसमधील प्रवासी होते, असे मायरेपब्लिका न्यूज पोर्टलने वृत्त दिले आहे.
ऋषी पाल शाही हा मूळचा बिहारच्या मोतिहारी शहरातील राजमुनुवा भागातील असून तो नेपाळमध्ये राहतो आणि तिथे काम करत असे. शोध मोहिमेसाठी नेपाळी लष्कर आणि नेपाळ पोलिसांचे ५०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. मायरेपब्लिकाने दिलेल्या वृत्तानुसार, ऑपरेशन दरम्यान त्रिशूली नदीत हरवलेल्या बसेस शोधण्यासाठी सशस्त्र पोलीस दल (APF) च्या वॉटर ड्रोनसह मोटरबोट्स आणि ड्रोनचा वापर करण्यात आला.