राज्याच्या दुर्गम भागात आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अत्यवस्थ रुग्णांना झोळीत टाकून रुग्णालयात आणावे लागल्याचे प्रसंग उद्भवतात. असे असताना फिरत्या दवाखान्यांची ही सेवा गेल्या वर्षभरापासून ठप्प का, असा प्रश्न मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पवार यांनी उपस्थित केला आहे.
संकेतस्थळावरील माहिती
राज्य आरोग्य संस्थेच्या संकेतस्थळावर या फिरत्या दवाखान्याच्या पथकाची (एमएमयू) माहिती मिळते. एका मोठ्या आकाराच्या बसगाडीमध्ये फिरता दवाखाना आणि सोबत वैद्यकीय पथकासाठी जीप असे तिचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण आजारांची औषधेही पथकासोबत असतात. गंभीर स्वरूपाचे रुग्ण आढळल्यास पथकाद्वारे त्यांना उप जिल्हा रुग्णालयात अथवा अन्य योग्य ठिकाणी उपचारांसाठी हलवले जाते.
परवडत नसल्याने सेवा बंद
‘दुर्गम भागात सार्वजनिक आरोग्यसेवा पुरवण्याचे काम शासनाने २०२१मध्ये आमच्या कंपनीला दिले. त्यासाठी आम्ही १२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दोन वर्षे आम्ही राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये सेवा दिली. दरम्यानच्या काळात इंधन आणि औषधांचा खर्च वाढला. त्यामुळे शासन देत असलेल्या निधीतून ही सेवा पुरवणे आम्हाला परवडेनासे झाल्याने गेल्या वर्षभरापासून आम्ही काम थांबवले आहे. शासनाने निधी वाढवून द्यावा यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. शासनासोबत आमचा पाच वर्षांचा करार आहे. या योजनेतील सर्व वाहने आमच्या मालकीची असून ती मुरबाडमधील आमच्या खासगी जागेत आहेत’, अशी माहिती ही आरोग्यसेवा पुरविणाऱ्या ‘आर. डब्ल्यू.’ कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.
ठाणे जिल्ह्यात सेवा सुरू असल्याचा दावा
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एक फिरता दवाखाना १५ जानेवारीपासून कार्यान्वित असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अमोल वाघ यांनी दिली.