Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Local Train Accident: महिन्याला १६० मृत्यू; मागील ७ महिन्यांत लोकल अपघातांत ११६१ प्रवाशांनी गमावला जीव

7

राजलक्ष्मी पुजारे,कल्याण : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीच्या लोकलमधून प्रवास करताना गर्दीतून पडल्याने, कधी रेल्वे रूळ ओलांडताना, कधी गाडीतून उतरताना पडल्याने, तर कधी स्थानकात लोकलच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांना जीव गमवावा लागतो. मागील सात महिन्यांत म्हणजेच, जानेवारी ते २७ जुलैपर्यत सीएसटीएम ते कर्जत-कसारा, चर्चगेट ते विरार-पालघर आणि नवी मुंबई या सर्व रेल्वे मार्गांवर १,१६१ प्रवाशांनी वेगवेगळ्या अपघातात जीव गमावला आहे. रेल्वे पोलिसांकडून अधिकृत देण्यात आलेली ही आकडेवारी अंगावर शहारा आणणारी आहे. या आकडेवारीनुसार दिवसाला सरासरी सहा प्रवासी जीव गमावत असून, इतर कोणत्याही दुर्घटनेपेक्षा ही आकडेवारी मोठी असल्याने, प्रवासी संघटनांकडून हे अपघात रोखण्याची मागणी होत आहे.

रेल्वेच्या आकडेवारीनुसार, जानेवारीत १७१, फेब्रुवारीत १५२, मार्चमध्ये १६५, एप्रिलमध्ये १७९, मे महिन्यात १८२, जूनमध्ये १३५, तर जुलैमध्ये १७७ प्रवाशांनी जीव गमावला असून, यात चालत्या लोकलमधून पडल्याने, उतरताना धक्का लागल्याने किंवा पाय घसरून पडल्याने; तर कधी रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रेल्वेच्या फलाटावर किंवा पादचारी पुलावर वावरणाऱ्या किंवा चालणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यूची नोंदही या आकडेवारीत घेण्यात आली आहे. यानुसार दिवसाला किमान सहा प्रवासी अशाप्रकारे प्राण गमावत असून, ही आकडेवारी थरकाप उडवणारी असल्याचे प्रवाशाचे म्हणणे आहे. हे रेल्वेबळी रोखून उद्ध्वस्त होणारी कुटुंबे सावरण्यासाठी रेल्वेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या दुर्घटनेत दगावलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांकडून करण्यात आली आहे.

रेल्वेकडून नुकसान भरपाई

रेल्वे दुर्घटनेत गर्दीच्या रेल्वेतून पडून दगावणाऱ्या प्रवाशाच्या नातेवाइकांना आठ लाखांची आर्थिक मदत दिली जात असली, तरी ही मदत मिळवण्यासाठी ४५ दिवसांच्या आत या दाव्यासाठी लागणारी सर्व प्रकारची कागदपत्रे कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाकडे सादर करावी लागतात. जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने आधीच खचलेल्या कुटुंबाकडून ही पळापळ नियमित वेळेत केली गेली नाही, तर ही मदत मिळणे कठीण होत असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. अनेकदा संबधित प्रशासनाकडून मृत्यूच्या दाखल्यासह इतर दाखले देण्यास होणारा विलंब त्यामुळे कुटुंबाची फरफट होते ते वेगळेच. मात्र, या मदतीपेक्षा जाणारा जीव महत्त्वाचा असल्याने ही जीवघेणी आकडेवारी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.

सात महिन्यांतील मृत्यू

जानेवारी – १७१
फेब्रुवारी – १५२
मार्च – १६५
एप्रिल – १७९
मे – १८२
जून – १३५
जुलै – १७७

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.