Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Revolution Day: ‘चले जाव’चा नारा देताच झालेली गांधीजींना अटक; रेडिओ जपानच्या बातमीनंतर अख्खं नागपूर पेटून उठलेलं

9

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधींनी १९४२ साली ‘चले जाव’चा नारा दिल्यानंतर त्यांना अटक झाल्याची बातमी नागपुरात रेडिओ जपानमुळे कळली आणि त्यानंतर पेटलेले नागपूर तब्ब्ल आठवडाभर धगधगत होते. ९ ऑगस्ट १९४२ला नागपुरातही या आंदोलनाचे लोण पसरले आणि हे आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी कामठीवरून लष्कर बोलावण्यात आले होते. महात्मा गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांच्या अटकेमुळे लोक प्रचंड संतापले होते. नागपुरात विजेच्या व टेलिफोनच्या तारा तोडण्यात आल्या होत्या.

तत्कालिन जिल्हाधिकारी लेयॉर्ड यांनी संचारबंदी लागू केली. मात्र, लोक आणखी पेटून उठले. नागरिकांनी वॉकर रोड पोलिस चौकीला आग लावली, सिटी कोतवाली पोलिस स्टेशनवर दगडफेक केली. गांधीजींना अटक होताच पं. रविशकंर शुक्ल व अन्य ज्येष्ठ नेते रेल्वेने नागपूरकडे निघाले. मात्र, वाटेत मलकापूर स्थानकावर त्यांना अटक करण्यात आली. इकडे शहरातील मोठे नेते भूमिगत झाले. काँग्रेस, हिंदुस्थानी लालसेना यांची कार्यालये पोलिसांनी सील केली.

‘चले जाव’ आणि ‘महात्मा गांधी की जय’चे नारे, हातात तिरंगा ध्वज फडकवित असलेले युवक आणि त्यांच्यामागे हजारो देशभक्त असे चित्र होते. टिळक पुतळा, बडकस चौक, इतवारी चौक, गांधी गेट, हंसापुरी, गांजाखेत, तांडापेठ, जागनाथ बुधवारी या भागात देशभक्तांच्या गर्दीने वाहतूक खोळंबली. महात्मा गांधींनी केलेल्या आवाहनाला नागपुरात लाभलेला हा प्रचंड आणि अभूतपूर्व प्रतिसाद होता. याच आंदोलनाच्या वेळी नागपुरात मेयो हॉस्पिटलपुढे कृष्णराव काकडे पोलिसांच्या गोळीबारात शहीद झाले होते. तेथे आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र, स्वातंत्र्य सैनिक मागे हटायला तयार नव्हते. त्यावेळी पोलिसांनी झाडलेली गोळी काकडे यांनी छातीवर झेलली. ती गोळी काकडे यांच्या छातीतून आरपार निघून जगन्नाथ गौर यांच्या हाताला लागली होती. या आंदोलनादरम्यानच महालातील शंकर महाले याच्या वडिलांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यावेळी १७ वर्षांच्या शंकर महाले याने आंदोलनात उडी घेतली.
शंकरसह नागरिकांनी चिटणवीसपुरा पोलिस चौकीवर हल्ला केला. या घटनेत एका इंग्रज पोलिसाचा मृत्यू झाला. एका पोलिसाचा गणवेश व त्याची बंदूक जमावाने ताब्यात घेतली. संतप्त जमावाने पोलिस चौकी पेटवली. इंग्रजांनी या घटनेत शंकर महालेंसह १३ जणांवर खटला भरला. त्यातील पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळी शंकर महाले १८ वर्षांचेही नव्हते. कायद्यानुसार १८ वर्षांपेक्षा कमी वयात फाशी देता येत नव्हती. त्यामुळे त्यांना कारागृहातच ठेवण्यात आले व १९ जानेवारी १९४३ रोजी ते १८ वर्षांचे होताच म्हणजे वाढदिवशीच दिवशीच त्यांना नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.