Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
प्रशासनाकडून दुर्लक्ष
प्लास्टिक बंदीबाबत प्रशासकीय पातळीवरच दुर्लक्ष होत असल्याने बाजारपेठेत एकल वापर प्लास्टिकची सर्रास विक्री होत आहे. काही वर्षांपूर्वी थर्मोकोल बंदी आल्यानंतर उत्सवातील सजावटीच्या साहित्यामध्ये प्लास्टिकचा वापर वाढत गेला. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी एकल वापर प्लास्टिकच्या (सिंगल यूज) वापरावर बंदी आणली. मात्र, त्या यादीत सजावट साहित्यातील निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचा समावेश झाला नाही. त्यामुळे या त्रुटीचा गैरफायदा घेऊन विक्रेत्यांनी या वस्तूंची विक्री सुरू ठेवली. प्रशासनानेही प्लास्टिक बंदीच्या जुन्या नियमावलीवर बोट ठेवून विक्रेत्यांवर कारवाईस टाळाटाळ केली.
एनजीटीचा आदेश
सजावट साहित्यातील प्लास्टिक फुलांचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) पुणे न्यायपीठासमोर दोन वर्षांपूर्वी दाखल झाली होती. प्लास्टिक फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत असल्याची सबब याचिकेत देण्यात आली होती. त्याची दखल घेऊन एनजीटीने या प्रकरणी केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणी समिती स्थापन करून नियमावली तयार करण्याचे आदेश दिला होता. गेल्याच वर्षी मंडळाने समितीही नेमली; पण या समितीचे निर्देश अद्याप स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी सजावट साहित्याबाबत सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्याची भूमिका स्वीकारली आहे.
‘यादीत समावेश नाही’
प्रशासकीय पातळीवरील अनास्थेचा फायदा घेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील दुकानांमध्ये असंख्य प्रकारचे निकृष्ट दर्जाचे प्लास्टिकचे सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. उत्सवादरम्यान वापरले जाणारे प्लास्टिकचे बहुतांश सजावट साहित्य ‘सिंगल यूज’ प्रकारात मोडते; मात्र केंद्र सरकारने बंदी आणलेल्या वस्तूंच्या यादीमध्ये प्लास्टिकची फुले आणि या सजावट साहित्याचा समावेश केलेला नाही, त्यामुळे आम्हाला कारवाई करता येत नाही, या प्लास्टिकच्या रंगीत फुलांचा समावेश बंदीमध्ये करावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
फुले त्रासदायक आहेत कारण
- कृत्रिम फुलांसाठी प्रामुख्याने पॉलिथिनचा वापर होतो.
- केंद्र सरकारने शंभर मायक्रॉनच्या आतील पॉलिथिनवर बंदी जाहीर केली आहे.
- बाजारातील प्लास्टिकच्या फुलांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, पॉलिथिनची जाडी सरासरी २९ मायक्रॉन आढळली.
- या फुलांसाठी वापरलेले रासायनिक रंग पर्यावरणीयदृष्ट्या घातक आहेत.
- कालांतराने साहित्याचा रंग फिका होतो, हळूहळू प्लास्टिकचे तुकडेही होतात.
- निकृष्ट दर्जामुळे या प्लास्टिकचे लवकर विघटन होत नाही.
केंद्र सरकारच्या पातळीवर सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंची यादीमध्ये सजावटीच्या प्लास्टिक फुलांचा समावेश नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत या साहित्याचे वाढते उत्पादन आणि निकृष्ट दर्जा लक्षात घेऊन त्यावरील बंदीसाठी दोन वर्षांपूर्वी एनजीटीकडे याचिका दाखल झाली होती. न्यायाधिकरणानेही दखल घेऊन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासह आठ सदस्यांची समिती नेमली. मात्र, समितीने दिलेला अहवाल वर्ष उलटूनही एनजीटीपर्यंत सरकारने पोहोचवलेला नाही. या दिरंगाईमुळे बाजारपेठेत सिंगल युज सजावट साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरू आहे.
ॲड. अनिरुद्ध कुलकर्णी, पर्यावरण कायदा विधिज्ञ
प्लास्टिकच्या साहित्याने व्यापली बाजारपेठ
- विक्रेते म्हणतात, प्लास्टिकला दुसरा रास्त दरातील पर्याय नाही, त्यामुळे आम्ही विक्री करतो
- प्लास्टिकच्या वस्तूंचे प्रमाण दर वर्षी वाढतच आहे.
- प्लास्टिकच्या माळा, हार, झुंबर, मखरासाठी खांब, कळस, प्लास्टिकची मंदिरेही बाजारात उपलब्ध.
- लाइटच्या माळांमध्येही प्लास्टिकची फुले, पानांचा वापर वाढला.