Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामाला गती देऊन जानेवारी २०२७ पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश
नागपूर, दि. २० : विधिमंडळ अधिवेशनासह मंत्रालयातील विविध कामांसाठी मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी निवासाची व्यवस्था होण्याकरिता उभारण्यात येत असलेल्या मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाला गती देऊन ते जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत दिले.
मुंबई येथील मनोरा आमदार निवास प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मनोरा आमदार निवासाच्या बांधकाम आराखड्यात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे हरित पट्टा, वाहनतळ, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यासारख्या सुविधांचे ठिकाण आणि क्षेत्र यामध्ये बदल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कामाच्या स्वरुपात झालेला बदल आणि त्याच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली. मनोरा इमारतीच्या बांधकामाचा वेग वाढवून ठरलेल्या वेळेच्या आता सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देशही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
या बैठकीस विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, लार्सन अँड टुब्रो कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी लार्सन अँड टुब्रो कंपनीतर्फे सादरीकरण करण्यात आले.
००००
संतोष तोडकर/विसंअ/