Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दाऊदी बोहरा मुस्लीम समुदायाची लोकसंख्या १० लाखांहून अधिक आहे. या समुदायाचे धर्मगुरु सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन हे आहेत. दाऊदी बोहरा मुस्लीम समुदायाच्या शिक्षण संस्था मुंबई, सुरत, कराची आणि नैरोबीमध्ये आहेत. मुस्लीम समुदाय भारतात अल्पसंख्यांक म्हणून ओळखला जातो. या अल्पसंख्याक समुदायात दाऊदी बोहरा हे अल्पसंख्याकं आहेत. मोदींनी नुकत्याच झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नेत्यांना पसमांदा आणि बोहरा मुस्लीम समुदायाशी संपर्क वाढवण्यास सांगितलं होतं.
दाऊदी बोहरा समुदाय त्यांच्या जुन्या परंपरांनुसार व्यापार आणि जनकल्याणकारी योजना राबववतात. राजकारण आणि आंदोलनांपासून ते दूर असतात. बोहरा समुदाय नागरिकत्व कायदा दुरुस्ती विरोधातील आंदोलनापासून दूर राहिला होता. वादग्रस्त मुद्यांपासून ते अलिप्त असतात.
दाऊदी बोहरा समुदाय आणि मुंबई
बोहरा हा शब्द गुजराती शब्द बहौराउ या शब्दाचा अपभ्रंश आहे. याचा अर्थ व्यापारी असा होतो. १५३९ च्या दरम्यान भारतात या समुदायाचा विस्तार झाला. उत्तर मिस्त्र म्हणजेच इजिप्तमधून ते भारतात आले. त्यांनी येमेनमधून त्यांचं मुख्यालय गुजरातच्या सिद्धपूरमध्ये आणलं. १५८८ मध्ये ३० वे सैय्यदाना यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वंशज दाऊद बिन कुतब शाह आणि सुलेमान शाह यांच्या सैय्यदाना पदवी आणि गादीच्या हक्कावरुन वाद झाले आणि त्यावेळी दोन प्रवाह निर्माण झाले. दाऊद बिन कुतुब शाह यांना मानणाऱ्या वर्गाला दाऊदी बोहरा तर सुलेमान यांना मानणाऱ्यांना सुलेमानी बोहरा म्हटलं जाऊ लागलं. सुलेमानी बोहरा यांचं मुख्य केंद्र येमेनमध्ये तर दाऊदी बोहरा समुदायाच्या धर्मुगुरुंचं मुख्यालय मुंबईत स्थापन करण्यात आलं.
दाऊदी बोहरा समुदायाच्या ४६ वे धर्मगुरु असताना पुन्हा एकदा विभाजन झालं होतं. बोहरा समुदायाची लोकसंख्या २० लाख आहे. त्यापैकी १२ लाख लोक दाऊदी बोहरा समुदायाचे आहेत. इतर ८ लाख लोक इतर बोहरा शाखांचे आहेत.
भारतात दाऊदी बोहरा समुदायाचे लोक प्रामुख्यानं महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, गुजरातमध्ये सुरत, अहमदाबाद, वडोदरा, जामनगर, राजकोट, नवसारी, दाहोद, गोध्रा, राजस्थानमध्ये उदयपूर, भीलवाडा, मध्य प्रदेशमध्ये इंदूर, बुऱ्हाणपूर, उज्जैन, शाजापूर आणि कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरु आणि हैदराबादमध्ये वास्तव्यास आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत दाऊदी बोहरा समुदायाची मतं देखील निर्णायक ठरु शकतात, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
नरेंद्र मोदी आणि बोहरा समुदायाची जवळीक
नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इंदूरमधील भाषणात बोहरा समुदायाचं कौतुक केलं होतं. मोदींनी बोहरा समुदायाच्या देशभक्ती आणि व्यापारातील इमानदारीचं कौतुक केलं होतं. बोहरा समुदायाशी जुनं नातं असल्याचं ते म्हणाले होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना बोहरा समुदायाला व्यापारासंदर्भातील नियमात सूट दिली होती. नरेंद्र मोदी विदेशात देखील बोहरा समुदायाच्या लोकांना भेटतात. २०१९ मध्ये ह्युस्टनमध्ये बोहरा समुदायाच्या लोकांना भेटले होते.