Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Success Story: पोलिओमुळे आले अपंगत्व; कष्टाच्या जोरावर बनले शास्त्रज्ञ, डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांच्याविषयी जाणून घ्या
मूळचे पुण्यातील असलेले डॉ. बोत्रे सध्या राजस्थानातील पिलानी येथील ‘कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’च्या अखत्यारितील सिरी (सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
भाऊसाहेब यांचे बालपण पुण्यातील रामवाडी वसाहतीत गेले. अवघे एक वर्षाचे असताना त्यांना ताप आल्याचे निमित्त झाले आणि दोन्ही पायांना पोलिओने ग्रासले. त्यानंतरही त्यांच्या आईने त्यांना शाळेत घातले. पुणे महापालिकेच्या लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेतून सातवी आणि सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांना दहावीत ८२ टक्के गुण मिळाले होते.
प्राथमिक शाळेत असताना ते मुलांच्या पाठंगुळी बसून शाळेत जात असत. मात्र, मोठे झाल्यावर त्यांना कुबड्यांवर चालता येत नव्हते. त्यामुळे ते दोन्ही हातांवरच चालत असत. दहावीनंतर त्यांनी वाडिया महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. इलेक्ट्रॉनिक्स विषयात ते तत्कालीन पुणे विद्यापीठात पहिले आले होते. विद्यापीठातूनच त्यांनी पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) पूर्ण केले. विशेष म्हणजे, या शिक्षणासाठी विद्यापीठाचे १० हजार रुपये शुल्क भरण्याचीही त्यांची परिस्थिती नव्हती.
समाजातून झालेल्या मदतीमुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय आला नाही. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विद्याशाखेत डॉ. दमयंती घारपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएच.डी’देखील संपादित केली. ‘आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क आणि गॅस सेन्सर ॲरे’च्या आधारे ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ तयार करून अन्नपदार्थांचा ताजेपणा, गुणवत्ता तपासणारे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न भाऊसाहेब यांनी केला. या संशोधनातून संगणकाला कोणत्याही अन्नपदार्थाचे गंध किंवा वास ओळखण्याचे सामर्थ्य येईल, यासंबंधीचे संशोधन त्यांनी केले.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नावाजले
२००५मध्ये बोस्टन (अमेरिका) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाऊसाहेब यांनी त्यांच्या संशोधनाची मांडणी केली होती. खरगपूर आणि बेंगळुरू येथे ‘आयआयटी’मध्ये झालेल्या कार्यशाळांमध्येही भाऊसाहेब यांनी प्रबंधवाचन केले. केंद्रीय विज्ञान संशोधन केंद्राची सीनिअर रिसर्च फेलोशिप त्यांना मिळाली. ‘फिजिक्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ सेन्सर्स’च्या दहाव्या राष्ट्रीय परिषदेत त्याच्या सादरीकरणाला पहिला आणि बेंगळुरूच्या स्पर्धेत कृत्रिम गंधसंवेदना पद्धतीबाबतच्या प्रबंधाला दुसरा पुरस्कार मिळाला होता. बोस्टन परिषदेत सहभागानंतर त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले.
संशोधनासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
दिव्यांगांनी सरकारी आणि गैरसरकारी संस्थांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष २०२१-२२चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार काही महिन्यांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात डॉ. भाऊसाहेब बोत्रे यांना संशोधन क्षेत्रातील दिव्यांग सक्षमीकरण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे नामांकन राज्यस्थान राज्य सरकारने पाठवले होते. डॉ. बोत्रे यांनी उतार रस्ते, उड्डाणपूल, डोंगरी भागातून दिव्यांगांना चढ-उतार करण्यासाठी इलेक्ट्रिकसोबतच हँड पायडल यंत्र विकसित केले आहे. यासह ‘ई-असिस्ट ट्रायसिकल’चे एक प्रोटोटाइप विकसित केले आहे.
माझ्या वाटचालीत मित्र, आप्तेष्टांचा मोठा हातभार आहे. अगदी विद्यापाठीचे शिक्षण शुल्क भरण्यापासून बोस्टन विद्यापीठातील परिषदेला जाण्यापर्यंत अनेक वेळा पुण्यासह नाशिक, अमेरिकेतील मराठीजनांनी प्रेरणा, मोठे सहकार्य आणि आर्थिक मदत केली. त्यामुळेच मी संशोधन पूर्ण करू शकलो. आता या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या दिव्यांगांना प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा आहे.
– डॉ. भाऊसाहेब बोत्रे, मुख्य शास्त्रज्ञ, सिरी, राजस्थान