Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया’चा नारा देत कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येता मागील १० वर्षापासून ती सातत्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. यिशीता ही पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात काम करत आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात तिचे शिक्षणाचे कार्य सुरु आहे.
यिशीता काळे ही मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील रहिवासी आहे. तिचे वडील वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये अधिकारी होते. त्यामुळे तिचे शिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातच झाले. विशेष म्हणजे यिशिता काळेने अमरावती विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. महाविद्यालयात रासेयोत काम करताना तिला समाजकार्याची ओढ लागली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला एका सॉफ्टवेअर कंपनीत चांगली नोकरीही लागली.
अभियांत्रिकीची पदवी घेतली असल्याने खरे तर मिळालेल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीत कोणीही आनंदाने जगू शकतो. पण ‘ती’ मात्र केवळ नोकरीत आनंदी नव्हती. तिच्या हळव्या मनाला चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील बालकांची केविलवाणी स्थिती सहन झाली नाही. ती थेट या अतिदुर्गम भागात पोहोचली व येथील मुलांना खेळांच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी लावत आहे.
तिने आधी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील इंदिरानगर वसाहतीत आणि इतर परिसरातील बालकांसाठी काम सुरू केले. करोना काळातही शिकवणी वर्ग सुरू होते. यिशीताने समर कॅम्प संकल्पनाही राबविली. हळूहळू तिचे कार्य विस्तारू लागले, आता ती गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील गावांमध्ये जात तिथल्या बालकांना अनेक खेळ शिकवत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगते. सुरुवातीला या कामात तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागला.
अतिदुर्गम भागात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असतानाही कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न बाळगता, येणाऱ्या संकटांची, अडचणींची पर्वा न करता ती गावातील चिमुकल्यांना भेटते. दुर्गम भागातील गावापर्यंत पोहोचायला बराच वेळ लागतो अनेकदा मुक्काम करण्याशिवाय पर्याय नसतो अशा वेळेस एखाद्या घरच्या पडवीतही ती आणि तिची सहकारी मुक्काम करतात.
या बालकांसाठी विविध खेळ घेताना त्यांना छोट्या-मोठ्या भेटवस्तूही देते. तिचा प्रवास,जेवण, खेळाचे साहित्य,भेटवस्तू या सगळ्यांचा खर्च ती स्वतः उचलते. यासाठी ती आपल्या पगारातील १० टक्के आणि वडिलांच्या पेन्शन मधील १० टक्के रक्कम राखून ठेवते.
विश्वास सोशल फाउंडेशन संस्थेची स्थापना
सुरुवातीला तिने भंगार वेचक, मजुरांची मुलं तसेच वयोवृद्धांना स्वाक्षरी पुरते शिक्षण दिले. आदिवासीबहुल खेड्यापाड्यात काम करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गावागावांत जाऊन काम करताना तुम्हाला यातून काय साध्य करायच आहे?, शिक्षण संस्था आहेत,तुम्हाला कुणी परवानगी दिलीय़ असे विविध प्रश्न उपस्थित केले जात होते.
आपल्या कामात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी एक आधार म्हणून तिने विश्वास सोशल फाउंडेशन ही सेवाभावी संस्था स्थापन केली आहे. आता त्या संस्थेच्या माध्यमातून मात्र कुठलीही प्रसिद्धी न करता गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात ती कार्यरत आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, ती मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावी. कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी मी काही वर्षांपासून काम करत आहे. आदिवासीबहुल भागात जाऊन चिमुकल्यांसोबत संवाद साधून विविध खेळांच्या माध्यमातून त्यांना शिक्षणात कसे आणता येईल? यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या चिमुकल्यांसोबत वेळ घालवताना कधी त्यांच्यासोबत जिव्हाळा निर्माण झाला हे कळलच नाही. गावात भेट देताच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघायला मिळते. त्यातच खूप समाधान वाटते.
–यिशिता काळे,चंद्रपूर