Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- महिला अधिकाऱ्याच्या ऑडिओ क्लीपने खळबळ
- लोकप्रतिनिधींवर केले गंभीर आरोप
- या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार
लोकप्रतिनिधींचा जाच आणि तक्रार करूनही वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगत आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लीप देवरे यांनी तयार केली होती. ती व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही खळबळ उडाली. विरोधी पक्षाकडून कारवाईची मागणी झाली. त्यासोबतच राजपत्रित अधिकारी महासंघानेही सरकारला निवेदन देऊन चौकशी करून संबंधितांवर चौकशीची मागणी केली.
राज्य महिला आयोगाने देवरे यांच्या क्लीपची दखल घेतली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील व तहसीलदार वैशाली आव्हाड यांचा समावेश आहे. ही समिती चौकशी करून आपला अहवाल देणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही नोंद केली नाही. मात्र, दखल घेतली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिस अधिकाऱ्यांनी देवरे यांच्याशी संवाद साधला आहे. कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, यासंबंधी पोलिसांकरवी त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
वाचाः ‘ते मोदी सरकारने करुन दाखवले’; भाजपचा शरद पवारांवर निशाणा
मधल्या काळात देवरे यांच्यासंबंधी आलेल्या विविध तक्रारींची पूर्वीच चौकशी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात हे काम झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑगस्टलाच आपला अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. काही तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने देवरे यांनी कामात कसूर केल्याचे आणि सेवा नियमांचा भंग केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा अहवाल बाहेर आला नव्हता. देवरे यांची क्लीप व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी हा अहवालही बाहेर आला आहे.
ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी देवरे यांच्यांशी संवाद साधला आहे. यामध्ये त्यांचे राज्यातील सहकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्याशी बोलताना देवरे यांनी आपण आता सावरलो असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या सोशल मीडिया ग्रूपवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. या प्रकारानंतर आपण वरिष्ठांशी आणि राज्य महिला आयोगाच्या पदाधिकाऱ्यांशीही बोललो आहोत. त्या सर्वांनी जगण्याची ताकद दिली आहे. आता यापुढे कधीही अशी निराश होणार नाही. पूर्वी महिलांसाठी काम केले आहे. आता पुन्हा त्या चळवळीत सक्रीय होणार आहे. सावित्रीबाईंनी मुलींना शिकून मुख्य प्रवाहात आणले. या मुली शिकून मोठ्या झाल्या. पण समाज त्यांना पुरूषांपेक्षा मोठ्या पदावर सहजासहजी पोहचू देत नाही. स्त्रीला आजही दगडगोटे खावे लागत आहेत. काही माघार घेतात तर काही लढून मरणे पसंत करतात. मीही लढून मरणे पसंत केले आहे. आता माघार आणि आत्मघातही नाही. आजपर्यंत घरच्यांसाठी खूप केले. यापुढील काळात माझ्या महिला अधिकारी सख्यांसाठी काम करणार आहे. आता मला इतरांसाठीही लढायचे आहे. तुन्ही सर्व महिला अधिकाऱ्यांनी साथ द्यावी, असेही देवरे यांनी त्यामध्ये म्हटले आहे.
‘नाकाने कांदे सोलणाऱ्यांचे नाकच कापले गेले’; त्या घटनेवरुन शिवसेनेचा भाजपला टोला