Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एकीकडे समस्त सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तसेच मनुष्यबळाचा तुटवडा चव्हाट्यावर येत असतानाच, रोज होत असलेल्या रुग्णांच्या मोठ्या प्रमाणातील मृत्युला सरकारी व्यवस्थाच कारणीभूत ठरत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. अलीकडे तर याची कितीतरी उदाहरणे समोर येत असताना, असे मूलभूत प्रश्न तसेच समस्या सोडवण्याऐवजी आणखी नवनवीन ‘फंडे’ मात्र कुठेही कमी होत नसल्याचे हमखास समोर येत आहे. त्याचाच भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतून देण्याचा ‘फंडा’ मागेच काढण्यात आला आणि त्यावर वैद्यक क्षेत्रातील मान्यवरांमधून मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. मात्र त्यातून कोणताही बोध न घेता वैद्यकीय अभ्यासक्रमानंतर आता राज्य सरकार दंतशास्त्राचे शिक्षण मराठीतून देण्याच्या हट्टाला पेटले असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून विविध महाविद्यालयांतील तज्ज्ञ शिक्षकांना भाषांतरासाठी जुंपल्याचेही समोर येत आहे. असेच एक पत्र महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना नुकतेच धाडण्यात आले आहे. या पत्रान्वये महाविद्यालयातील तज्ज्ञ शिक्षकांकडून १३ विषयांचे विविध धडे भाषांतरीत करून घेण्याच्या सूचना अधिष्ठातांना देण्यात आल्या आहेत. या १३ विषयांमध्ये डेंटल ॲनाटॉमी, डेंटल मटेरियल, प्रोस्थोडोन्टिक्स अँड क्राऊन अँड ब्रीज, प्रीक्लिनिकल कॉन्झरव्हेटिव्ह, कॉन्झरव्हेटिव्ह डेन्टिस्ट्री अँड एन्डोडोन्टिक्स, पेरिडोन्टोलॉजी, ऑर्थोडोन्टिक्स अँड डेन्टोफेशियल ऑर्थोपेडिक्स, ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जरी, ओरल अँड मॅक्झिलोफेशियल पॅथॉलॉजी अँड ओरल मायक्रोबायोलॉजी, पीडियाट्रिक डेन्डिस्ट्री, पब्लिक हेल्थ डेन्टिस्ट्री आदी विषयांचा समावेश आहे. तसेच भाषांतरीत धडे विशिष्ट फॉन्टमध्ये अधिष्ठात्यांमार्फत विद्यापीठास लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचनाही पत्रात देण्यात आल्या आहेत.
संज्ञा तशाच ठेवण्याची मुभा
संबंधित विषयांचे भाषांतर करताना तांत्रिक संज्ञा जशास तशा ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. वैद्यकीय तसेच दंतशास्त्रातील संज्ञांचे भाषांतर करणे अत्यंत अवघड व क्लिष्ट असून, त्यासाठी मराठीतील अचूक शब्द सापडणे महाकठीण असल्याचा अनुभव काहींनी नाव न घेण्याच्या अटींवर नमूद केला आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा संज्ञा किंवा दंतशास्त्राचा मजकूर भाषांतर करताना ‘गुगल’ किंवा इतर कुठलाही आधार घेतला तरी त्याचे भाषांतर भलतेच होत असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा भाषांतराची महाकठीण कसरत करुनही त्याचा अर्थबोध किती होईल, याविषयी शंका घेतली जात आहे. खरे म्हणजे अशा प्रकारच्या भाषांतराचा अर्थ समजून घेण्यापेक्षा थेट इंग्रजीतून समजून घेणे जास्त सुलभ आहे आणि त्यामुळे मुळात अशा भाषांतराची गरजच नाही, असाही सूर शिक्षकांमधून उमटत आहे.
आधी मराठीतून ग्रंथ उपलब्ध करण्याची मागणी
मातृभाषेतून शिक्षणाचे स्वागतच आहे. रशियात वैद्यकीय शिक्षण घेणारे आधी रशियन शिकतात. तसेच आता ‘नीट’ ही सात भाषांमधून देता येते व त्यामध्ये मराठी एक पर्याय आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी मराठी भाषा स्वीकारतात व त्यांना लाभ होतो. मात्र वैश्विक शास्त्र असलेल्या वैद्यकशास्त्र किंवा दंतशास्त्राचे भाषांतर हे कादंबरीसारखे नाही. यात शास्त्राची आणि मराठीची सर्वोत्तम जाण असणारेच भाषांतर करू शकतील व असे तज्ज्ञ किती आहेत? तसेच संज्ञेचे भाषांतर कसे करणार? पुन्हा मराठीत ‘यूजी’ झालेला विद्यार्थी विदेशात ‘पीजी’ कसा करू शकेल, शोधनिबंध कोणत्या भाषेत लिहिणार? असे विविध प्रश्न आहे. त्यामुळे दंतशास्त्राचे आधी मराठीत ग्रंथ उपलब्ध होऊ द्यावेत व नंतर निर्णय घेण्यात यावा, असे मत महाराष्ट्र दंत परिषदेचे राज्य अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
दंतशास्त्र मराठीतून शिकवण्याचा निर्णय पूर्णत: चुकीचा व निरर्थक आहे. याचा काही एक उपयोग होणार नाही. यातून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रकार पूर्वी जिथे झाला ती महाविद्यालये बंद पडली आहेत, यावरून तरी बोध घ्यायला हवे होते.-डॉ. एस. पी. डांगे, माजी अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व माजी सहसंचालक (दंत), डीएमईआर