Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

योग्य वेळेत, संपूर्ण पेपर कसा सोडवायचा? वाचा परीक्षेसाठीच्या खास टिप्स

20

Exam Tips For Student: परिक्षा जवळ आली ही विद्यार्थ्यांच्या पोटात गोला येतो. कारण अभ्यास झाला असला तरी पेपर कसा जाणार, तो पूर्ण होणार का, पेपर लिहिताना वेळ पुरणार का असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतात. सध्या सहामाही परीक्षा, सत्र परीक्षा सुरू आहेत आणि लवकरच बोर्डाच्या परिक्षाही येऊ घातल्या आहेत. त्यामुळे परीक्षा देताना कोणतीही गडबड न होता अगदी सहज आणि सोप्या टिप्स वापरुन पेपर कसा पूर्ण करायचा ते जाणून घेऊया.

वेळेच्या आधी पोहोचा: परीक्षा देताना सर्वात महत्वाची असते ती वेळ. त्यामुळे परीक्षेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे. तिथली आसनव्यवस्था, तिथले वातावरण याच्याशी आपण जुळवून घेतले तर त्या ठिकाणी पेपर देताना आपल्याला सहजपणा जाणवतो, त्या जागेचे दडपण निघून जाते. परीक्षेच्या आधी काही सूचना दिल्या तर त्याही आपल्याला समजतात. विशेष म्हणजे उशिरा पोहोचलो तर पेपर सोडवताना गोंधळ उडून अनेक चुका होऊ शकतात.

स्वतःला शांत ठेवा: बर्‍याचदा अभ्यास झालेला असतो पण आपला परीक्षेचे दडपण आल्याने मनातून गोंधळ उडालेला असतो. काय लिहायचे, काय नाही याची चिंता असते. त्यामुळे अभ्यास असतानाही ऐनवेळी परीक्षा केंद्रावर घाईगडबड होते आणि त्याच गडबडीत आपण अनेक चुका करतो. त्यामुळे परीक्षा देताना स्वतःला शांत ठेवणे गरजेचे आहे. आपला किती आभ्यास झाला आहे, आपल्याला काय लिहायचे आहे याचे नियोजन करून परीक्षेआधी शांत राहणे आवश्यक आहे.

पेपर सोडवण्या आधी: परीक्षा केंद्रावर सर्वप्रथम उत्तरपत्रिका दिली जाते. त्यामुळे उत्तरपत्रिका हातात येताच आपला हजेरी क्रमांक, परीक्षा क्रमांक, विषयाचा कोड आणि इतर सगळे तपशील काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. उत्तर पत्रिकेचे तपशील लिहिताना त्यामध्ये चुका होता कामा नये, जेणेकरून गुणांकन करताना अचूक पद्धतीने केले जाईल. यासोबतच पेपर सुरू होईपर्यंत समास आखून घ्यावे ज्यामुळे उत्तरपत्रिका नेटकी आणि वाचनीय दिसते.

(वाचा: Sangli Rojgar Melava 2023: सांगलीकरांसाठी शासनाचा रोजगार मेळावा; कधी, कुठे जाणून घ्या सर्व तपशील )

प्रश्नपत्रिका हातात आल्यावर: प्रश्नपत्रिका हातात आल्यावर सर्वात आधी पूर्ण प्रश्नपत्रिका वाचावी. जे प्रश्न येत आहेत, जे सोपे प्रश्न आहेत ते आधी सोडवून घ्यावेत. कारण जे प्रश्न येत नाहीत त्याचा विचार करण्यात अधिक वेळ निघून जातो. एकदा जे प्रश्न येत आहेत ते सोडवून घेतले की राहिलेला वेळ नंतर अवघड प्रश्नांना देता येतो.

पेपर लिहिताना: पेपर सोडवताना प्रश्न, उपप्रश्न यांचे क्रमांक योग्य लिहिणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांचा क्रमांक चुकला आणि उत्तर बरोबर असले तरीही गुण दिले जात नाहीत. शिवाय नवीन प्रश्न नव्या पानावर लिहावा. पेपर हा सुटसुटीत आणि मुद्देसूत असावा. मोठाले उतारे लिहिण्यापेक्षा मुद्देसूत लिहिला तर शिक्षकांना पेपर तपासणे अधिक सोपे होते.

टापटीपपणा हवा: आपल पेपर टापटीप असेल तर पेपर तपासणारे शिक्षकही गुण देताना त्याचा विचार करतात. त्यामुळे पेपरमध्ये अवाजवी चुका, खाडाखोड, शाईपेनाचे डाग, जिथे चुकले असेल तिथे गिरवलेले मोठे गोळे हे असले प्रकारा टाळावेत. पेपर अस्वच्छ असेल तर उत्तर बरोबर असूनही गुण कमी होण्याची शक्यता असते.

अधिकचे लिहिणे टाळा: अनेकदा असेही होते की, जो प्रश्न येत असतो त्याचेच उत्तर आपण खूप लिहीत जातो. पण अशाने वेळ आणि मेहनत दोन्हीही वाया जाते. जे आवश्यक आहे, अपेक्षित ते आणि तेवढेच पेपरात लिहावे. उत्तर लिहिताना त्या प्रश्नाला असलेले गुण लक्षात घेणेही गरजेचे आहे.

अवघड प्रश्न सोडवताना: अवघड प्रश्न सोडवताना त्यावर फार वेळ विचार करण्यापेक्षा त्यातले जे येत आहे, ज्याचे आकलन झाले आहे ते लिहून काढावे. तो प्रश्न न सोडवून गुणांचे नुकसान करण्यापेक्षा तो लिहून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून पेपर अपूर्ण राहणार नाही, सर्व प्रश्न सोडवले जातील आणि योग्य वेळेत पेपर पूर्ण होईल.

(वाचा: Nashik Mahanagarpalika Bharti 2023: नाशिक महानगरपालिकेत विविध पदांची भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.