Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सेलू तालुक्यातील अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर गाठी-भेटी दौऱ्यांतर्गत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता जाहीर सभा आयोजिण्यात आली होती. त्यावेळी जरांगे पाटील बोलत होते. भरउन्हात सभेला लाखोंच्या संख्येने मराठा जनजागर लोटला होता. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृटी करून जरांगे यांनी अभिवादन केले. मराठा भगिनींनी जरांगेंचे औक्षण केले. सेलू तालुक्यातील डिग्रस बरसाले येथील हुतात्मा अनंत लेवडे यांच्या आईवडिलांच्या हस्ते जरांगे यांचा सन्मान करण्यात आला.
सरकारने आता तरी भानावर यावे. नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न करून नये. महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल, असा इशारा देऊन जरांगे पाटील म्हणाले, की कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरू आहे. १९६७ च्या आधीपासूनचे पुरावे सापडले आहेत. गायकवाड आयोगाने मराठ्यांना बारा-तेरा टक्क्यांनी मागास सिद्ध केले. सर्व निकष पूर्ण केले तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. ज्यांनी निकष पूर्ण केले नाहीत, तरी त्यांना आरक्षणात घेतले. ज्या लेकरांची एका टक्क्याहून संधी हुकली. त्या लेकराचे आयुष्य आणि भविष्य उध्द्वस्त झाले आहे, याची जाणीव असू द्या. मराठ्यांच्या डोक्यात आले, तर लेकरांच्या हितासाठी मराठा कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. पण मराठ्यांनाही मर्यादा आहेत, असा निर्वाणीचा इशाराही जरांगे यांनी सभेतून दिला.
महिलांचा आजपासून जागर
आरक्षणासाठी मराठ्यांचा हा लढा अंतिम टप्प्यात आहे. ८० टक्के लढाई जिंकली आहे. त्यामुळे बेसावध राहू नका. अशी संधी पुन्हा येणार नाही. तुम्ही खांद्याला खांदा लावून लढा. मी मरायला भीत नाही. आता बेसावध राहू नका. एकजूट दाखवा. गावेची गावे पिंजून काढा. जागृती करा. महिलांनीही मागे हटू नका. २३ डिसेंबरपासून महिलांनीही दररोज आरक्षणाचा जागर घालायला सुरूवात करावी, असे आवाहन जरांगे यांनी केले.
दरम्यान, जरांगे यांचे ३१ जेसीबीतून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. सभास्थळी चोहोबाजूंनी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. घराच्या छतावर, रस्त्यारस्त्यावर, नूतन महाविद्यालयाच्या सागवान झाडांच्या प्रकल्पात बसूनही मराठा बांधवांनी सभेला हजेरी लावली.
भानगडी नको, तोडगा काढा
समितीला ५४ लाख मराठा आरक्षणासाठीच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. याच नोंदीप्रमाणे अहवाल स्वीकारून सरकारला कायदा करायला काय अडचण आहे, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. याच नोंदी सत्तर वर्षापूर्वी मराठ्यांना दिल्या असत्या, तर आरक्षणामुळे मराठा समाज प्रगत म्हणून जगात पुढे आला असता, परंतु जाणूनबुजून आरक्षण दिले नाही. नोंदी असूनही कुळापासून लपवून ठेवल्या, असा घणाघात जरांगे यांनी या वेळी केला.
मुंबई बघायची नाही ?
सभास्थळी ‘२५ डिसेंबरला मुंबईत’, अशा आशयाचे बॅनर झळकले होते. मुंबईतील आंदोलनाबाबत सकाळी पत्रकार परिषदेतही मनोज जरांगेंना पत्रकारांनी विचारणा केली. परंतु, जरांगेंनी यावर भाष्य टाळले. मात्र, जाहीर सभेत मिश्किल भाषेत टिप्पणी करून मुंबई गाठायचा इरादा पक्का केल्याचे दिसून आले.