Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- मृणालताई गोरे कलादालनाचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन
- शरद पवारांनी जागवल्या जुन्या राजकीय आठवणी
- मृणालताई गोरे यांच्या कार्याचा केला गौरव
गोरेगावातील केशवराव गोरे स्मारक ट्रस्टच्या इमारतीत समाजवादी नेत्या मृणालताई गोरे दालन सुरू करण्यात आलं आहे. या दालनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी पवारांनी मृणालताईंच्या कार्याचा गौरव केला. ‘मृणालताई व आम्ही विधिमंडळात एकत्र होतो. बरेवाईट संबंध होते. राजकीय मतभेद प्रचंड होते. व्यक्तिगत सलोखाही तितकाच होता. १९७२ला वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात मला गृह राज्यमंत्री पदाची पहिली संधी मिळाली. भाऊसाहेब वर्तक त्यावेळी अन्न व नागरी विभागाचे मंत्री होते. महागाईचा प्रश्न होता. त्याचं नेतृत्व अहिल्याताई व मृणालताईंनी घेतल्याचं आम्ही पाहिलं. यात प्रचंड मोठा संघर्ष त्यांनी मुंबईत केला. वर्षभर हा संघर्ष सुरू होता. दरम्यान नाईकसाहेबांनी मला बोलावून घेतलं आणि गृहखात्यासोबत अन्न व नागरी विभागाचं खातं घे आणि फक्त या लाटणेवाल्यांना संभाळायचं काम कर असं त्यांनी सांगितलं. साहजिकचं यासाठी ताईंशी सुसंवाद ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता. हे काम करताना थोडा जरी विलंब झाला तर लाटण्याचा प्रसाद मिळाल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. विधिमंडळात मी मुख्यमंत्री झालो त्याआधीच्या काळात मृणालताई या विरोधी पक्ष नेत्या होत्या. अनेक प्रश्नांवर त्या कडाडून हल्ला करायच्या,’ अशी आठवणही त्यांनी सांगितली.
वाचा: मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा विक्रम; राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…
‘मृणालताईंच्या एका वेगळ्या पद्धतीच्या स्मारकाचा विचार केला गेला याचं मला समाधान आहे. त्यांच्या सबंध जीवनाचे दर्शन या फोटोंच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे दर्शन केवळ त्यांच्यापुरतं नाही तर महाराष्ट्रातील चळवळी, समाजकारण, राजकारण, महाराष्ट्रातील बदलतं चित्र या सगळ्याबद्दल एक सिंहावलोकन करण्याची संधी या दालनाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण सोडून देऊन सामाजिक रोगावर उपचार करण्यासाठी चूलघरातील लाटणे, हंडे आणि थाळ्यांसारखी हत्यारे हाती घेऊन संघर्ष उभा करणाऱ्या मृणालताईंना कलादालनाच्या रूपाने दिलेली खरी श्रद्धांजली आहे. हे दालन नव्या पिढीला प्रेरणा देणारं ठरेल,’ असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
वाचा: ‘अजूनही वेळ गेलेली नाही; ‘या’ फॉर्म्युल्यावर शिवसेना-भाजपची युती होऊ शकते’