Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिवसेना नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा; ‘हे’ नेते रडारवर

16

मुंबईः महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या व मंत्र्यांच्या मागे ईडीची पिडा सुरू झाली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते ईडीच्या रडारवर असताना आता शिवसेना नेत्यांच्या मागेही ईडीचा ससेमिरा सुरू झाला आहे. आत्तापर्यंत शिवसेनेचे कोणते नेते ईडीच्या रडारवर आले आहेत याबाबत घेतलेला सविस्तर आढावा

प्रताप सरनाईक

शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठीमागेही ईडीचा ससेमिरा लागला आहे. सरनाईक यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी सुरु होती. प्रताप सरनाईक हे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघातून सलग तीनवेळा ते निवडून आले आहेत.

मनी लाँडरिंगसह अन्य काही प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाकडून प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु आहे. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल) आणि टिटवाळा येथील एका जमीन व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आला आहे. सरनाईक यांची मुले विहंग व पूर्वेश तसंच, निकटवर्तीय योगेश चंडेला यांच्यावरही या प्रकरणात ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक हे प्रवर्तक असलेल्या टॉप सिक्युरिटी या कंपनीत ब्रिटनहून मुंबई पोहोचलेल्या परदेशी निधीचा गैरवापर झाला, असा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) संशय आहे.

वाचाः शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स

भावना गवळी

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याशी संबंधित संस्थांच्या नऊ ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी छापे टाकले होते. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या गवळी यांच्या वाशिममध्ये विविध शिक्षण संस्था व कृषी उत्पादन संस्था आहेत. या संस्थांच्या खरेदी-विक्रीत जवळपास ७२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’चा संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ने रिसोड व देगाव येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड, बीएएमएस कॉलेज तसेच रिसोड तालुक्यातील भावना अॅग्रो लिमिटेड या संस्थांशी संबंधित असलेल्या नऊ ठिकाणांवर छापे टाकले. ‘गवळी यांच्याशी संबंधित या संस्थांची खरेदी-विक्री कमी-अधिक प्रमाणात झाली. काही ठिकाणी वाजवीपेक्षा अधिक रक्कम देण्यात आली आहे. तर काही व्यवहारांत अत्यल्प दराने संस्था खरेदी किंवा विक्री झाली आहे. याशिवाय वाशिम-लातूर राज्य महामार्ग कामात कंत्राटदाराकडून खंडणी वसूल झाल्याचीही माहिती आहे. त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. त्याचा तपास करण्यासाठी हे छापे टाकण्यात आले’, असे ‘ईडी’तील सूत्रांनी सांगितले.

अनिल परब

अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीचा समन्स बजावला होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपये खंडणीच्या आरोपप्रकरणी चौकशी करायची असल्याचं ईडीने म्हटलं होतं. अनिल देशमुखप्रकरणी काही जणांची चौकशी करण्यात आली. विशेषत: बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली. या माहितीनुसार, या प्रकरणात अनिल परब यांचादेखील सहभाग असल्याचा संशय आहे. मुंबई महापालिकेतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना अनिल परब यांनी जानेवारी २०२१ मध्ये दिली होती, असे वाझे याने न्यायालयालाही सांगितले आहे. या सर्व माहितीनुसार, यामध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा संशय आहे. त्यामुळेच प्रकरणाच्या प्रत्यक्ष चौकशीसाठी परब यांना हा समन्स बजावण्यात आला आहे. मुंबईतील बलार्ड पीयर येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयात परब यांना मंगळवारी सकाळी उपस्थित राहायचे आहे’, असे ‘ईडी’तील सूत्रांनी सांगितले.

वाचाः ‘त्यादिवशी ओवेसींना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर…; शिवसेनेनं फटकारले

आनंदराव अडसूळ

शिवसेनेचे माजी खासदार आनंदरावर अडसूळ यांनाही ईडीने समन्स बजावले आहेत. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून संघर्ष सुरू आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रवी राणा यांनी ईडीकडे अडसुळांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अडसुळ यांना ईडीने समन्स बजावले असून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.