Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मटा ग्राउंड रिपोर्ट: ‘केसीआर’च्या रोड शोमध्ये मोदींचीच चर्चा; तरुणांमध्ये विकासकामांविषयी आशा

10

कामारेड्डी : विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर, गमावलेला जनाधार विशेषत: शेतकऱ्यांची मते मिळविण्यासाठी भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) कंबर कसली आहे. पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) बसयात्रेच्या माध्यमातून राज्य पिंजून काढत आहेत. मात्र, ‘बीआरएस’च्या रोड शोमध्ये चर्चा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच दिसून येत होती.

माजी मुख्यमंत्री ‘केसीआर’ आणि विद्यमान मुख्यमंत्री रेवंत रेड्डी अशा दोन मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा मतदारसंघ म्हणून कामारेड्डीची ओळख झाली आहे. येथून भाजपचे व्यंकट रमण रेड्डी विजयी झाले. आता कामारेड्डी पुन्हा कोणाला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील पराभवानंतर लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने ‘केसीआर’ यांनी २४ एप्रिल रोजी बसयात्रेला सुरुवात केली. ही बसयात्रा राज्यातील ४० शहरांमध्ये जाणार असून, प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत ‘केसीआर’ या यात्रेतून प्रचार करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत ‘केसीआर’ यांना पराभवाचा झटका बसलेल्या कामारेड्डीमध्ये मंगळवारी रात्री ही बसयात्रा पोहोचली. पूर्वीच्या ‘टीआरएस’चा (आताची बीआरएस) बालेकिल्ला असणाऱ्या कामारेड्डीमध्ये आता भाजपने प्रवेश केला आहे. कामारेड्डी विधानसभा मतदारसंघ हा जहिराबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. जहिराबादमधील ‘बीआरएस’चे खासदार बी. बी. पाटील या वेळी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, कामारेड्डीतील पराभव आणि बी. बी. पाटील यांचे पक्षांतर या दोन्ही घडामोडींतून ‘बीआरएस’ने कामारेड्डीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, या भागातील नाराज जनतेला आपल्या बाजूने आणण्यासाठी ‘बीआरएस’ला मेहनत करावी लागणार आहे.

सन २०१६मध्ये कामारेड्डी जिल्ह्याची स्थापना झाली. या निर्णयानंतर आमचे गाव जिल्हा झाले, यापेक्षा वेगळा बदल झाला नाही, असे इरफान कादरी हा रिक्षाचालक सांगत होता. या वेळची निवडणूक काँग्रेस आणि भाजप यांच्यातील आहे, असे तो सांगत होता. तर, जवळच्या पोप्रियाल गावातून बाजार समितीमध्ये आलेले पी. मोहन रेड्डी यांना काँग्रेसने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आणि पाच एकरांपर्यंतची थेट मदत या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. ‘बीआरएस’च्या काळामध्ये शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत मिळालीच नाही, असा आरोप त्यांनी केला. ‘आता मतदान जवळ आल्यामुळे, राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात झाली आहे.’ त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो, असे राजू नावाचे खतविक्रेते सांगतात. ‘केसीआर हुशार आहेत; पण स्थानिक नेत्यांनी भ्रष्टाचार केला. त्यामुळे मोदीच निवडून यावेत,’ असे लक्ष्मण गड्डम सांगत होते. जन्माने मुंबईचे असणारे गड्डम काही वर्षांपूर्वी मूळगावी म्हणजे कामारेड्डीला स्थायिक झाले आहेत. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गर्दीत नागराज नावाचा तरुण उभा होता. कुवेतमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर तो आता शेती करण्यासाठी परतला आहे. तो म्हणाला, ‘मी रोड शोसाठी आलो आहे; पण मतदान मोदींनाच करणार आहे.’ शेजारच्या सिरीसिल्ला विधानसभा मतदारसंघातून आलेले रवी एका महाविद्यालयात शिकवतात. त्यांनी विधानसभेला ‘बीआरएस’ला मतदान केले होते. या वेळी मात्र मोदी यांच्यासाठी मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मटा ग्राउंड रिपोर्ट: कॉंग्रेसच्या सहा हमींभोवतीच प्रचाराचे केंद्र; जनतेच्या फसवणुकीचा विरोधकांचा आरोप
लोकगीतांमधून कामांची आठवण

कामारेड्डी शहरातून रोड शो झाल्यानंतर बाजार समितीसमोरील चौकात ‘केसीआर’ यांची सभा होती. त्यासाठी सर्वत्र गुलाबी पताका लावल्या होत्या. माजी नगराध्यक्ष पिपली व्यंकटेश सर्व तयारीवर लक्ष ठेऊन होते. पाच वाजल्यापासून गटागटाने नागरिक येण्यास सुरुवात झाली. त्यांना घेऊन येणारा कार्यकर्ता सर्वांना व्यंकटेश यांच्यासमोर घेऊन जात होता आणि नंतर ते कोपऱ्यातील जागा पकडून बसत होते. ‘विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता जनतेला बीआरएसविषयी सहानुभूती वाटत आहे,’ असे व्यंकटेश सांगत होते. व्यासपीठावरून लोकगीतांद्वारे प्रचार सुरू झाला. ‘केसीआर यांनी गावात पाणी कसे आणले’, ‘आपल्याला तेलंगणमध्ये गुलाबी झेंडा रोवायचा आहे’ अशा आशयाची ही गाणी होती. प्रत्येक गाण्यानंतर ‘जय जय तेलंगण’च्या घोषणा देण्यात येत होत्या. तर, एक कलाकार रेवंत रेड्डी यांच्या आश्वासनांचा उल्लेख करून, या योजना फसव्या आहेत, असा दावा करत होता.

औद्योगिक झोनची नाराजी कायम?

केसीआर यांनी राज्यात १३ ठिकाणी औद्योगिक झोन उभारण्याचे जाहीर केले होते. त्यामध्ये कामारेड्डी परिसरात एक हजार एकर भूसंपादन होणार होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी नाराज होते. विधानसभा निवडणुकीत यातील २५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केला. त्यांना मिळालेल्या मतांमुळे ‘केसीआर’ यांना ६७४१ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. ‘शेतकऱ्यांमधील नाराजी कायम आहे आणि भाजपसाठी चांगले वातावरण आहे. बीआरएसचे कार्यकर्तेही आम्हालाच मतदान करतील,’ असे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते श्रीकांत सांगत होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.