Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Uttar Pradesh: इराणींची पहिली लढाई पक्षांतर्गत नाराजीशी; अमेठीत भाजप कार्यकर्त्यांचा रोष शांत करण्याचे आव्हान
जायसवरून आल्यावर साधारण २०-२५ मिनिटांत पेट्रोल पंप लागला. तेथे भाजपचे कार्यालय एका वाटसरूला विचारले. त्याने हातानेच समोरच्या दिशेला इशारा केला आणि ‘मॅडम हारेगी… जरूर हारेगी’, असे अत्यंत त्वेषाने म्हणाला. इराणी यांच्या विरोधात खदखद मांडणारी ही पहिली प्रतिक्रिया. नंतर उत्तरोत्तर यात भर पडत गेली. भाजप कार्यालयाच्या मार्गावर एका टपरीवर गप्पा मारत बसलेल्या तिघांना बोलते केले. ‘दीदींवर काही लोक नाराज आहेत. त्यांची मते काँग्रेसला जाऊ शकतात; पण जिंकणार भाजपच,’ रामनरेश अधोरेखित करून सांगत होता. ‘गांधी परिवाराने आमचा काय विकास केला? दीदींना आणखी वेळ द्यायला हवा,’ त्याने हाताची घडी घालत गंभीर चेहरा करत सांगितले. ‘सरकार कोणतेही असो कोण ना कोण नाराज होणारच…’ बाजूलाच बसलेले रामनरेश यांनी मध्यस्थीचा सूर लावला.
निवांत रस्त्याने पुढे गेल्यावर किराणा दुकानात दोन मित्र निवांत गप्पा मारत होते. त्यातील अनिल भदौरिया हे पत्रकार. त्यांनी काँग्रेसने केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली. ‘लोकांना रोजगार मिळावा म्हणून गांधी परिवाराने येथे तशी साधने निर्माण केली. एचएल, बीएचईएल, एसीसी सिमेंट यामुळे किती जणांना रोजगार मिळाला. इराणी यांच्या काळात मतदारसंघाचे नुकसानच झाले. काम न केल्याने राहुल यांचा पराभव झाला, असे मतदार सांगतात. मग इराणी यांनी काम केले नाही, त्यामुळे त्यांना बाहेरचा रस्ता का दाखवायचा नाही,’… भदौरिया हातवारे करून सांगत होते. त्याचवेळी आदित्यनाथ यांच्या सभेला उपस्थित राहा, अशी घोषणा देत एक गाडी वेगाने निघून गेली.
गांधी परिवारातील कोणीही निवडणुकीच्या रिंगणात नाही, यामुळे काही मतदार नाराज असले, तरी के. एल. शर्मा येथील जुने नेते आहेत. येथील माणसे, त्यांचे प्रश्न आणि गरजा ते जाणून आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी योग्य आहे, असाही एक मतप्रवाह येथे दिसतो. मुंशीगंजच्या दिशेने जाताना रस्त्याच्या कडेला बसलेल्या १५-२० जणांच्या गटाने याबाबत चर्चा करतानाच आपापली मते व्यक्त केली. हे रहिवासी खरे तर भाजपचे कार्यकर्ते; पण इराणी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. यामध्ये सफारी घालून बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाने इतरांचा रोष शांत करण्याचा प्रयत्न केला; पण तरीही त्यांची नाराजी लपली नाही. ‘राहुल यांचा पराभव झाला म्हणून त्यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या उमेदवाराला रिंगणात उतरवले. हा आमचा अपमानच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आमच्या मनात कोणताही किंतु नाही. इराणी यांनी अनेकांना दुखावले हे खरे; पण त्यांना संधी द्यायला हवी,’ ते अगतिकतेने सांगत होते; परंतु अन्य कार्यकर्त्यांनी या मताशी सहमती दर्शवली नाही.
संजय सिंह यांच्या पराभवाचा संताप
इराणी यांच्या इशाऱ्यावरून अमेठीचे राजे डॉ. संजय सिंह यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. इराणी यांच्या सूचनेवरून त्यांना पक्षाचा पाठिंबा मिळाला नाही, असे कार्यकर्ते समजतात. सिंह यांना मानणारा भाजपचा मोठा वर्ग अमेठीच्या पाचही विधानसभा मतदारसंघांत आहे. आमदारांचे ऐकले जात नाही, अशीही तक्रार आहे. इराणी केंद्रीय मंत्री असूनही त्यांनी मतदारसंघासाठी विशेष नवे काहीही आणले नाही. गांधी परिवाराने ते केले होते, अशी लोकांची धारणा आहे.
‘इराणींच्या पाठवणीची वेळ’
‘गेल्या वेळी आमच्यात अतिआत्मविश्वास होता. त्यामुळे चुका झाल्या. यावेळेस जिंकण्यासाठी आम्ही प्रत्येक पातळीवर काम करत आहोत. अगदी प्रत्येक घरात जाऊन प्रचार करत आहोत. स्मृती इराणी यांनी अनेकदा अमेठीची हेटाळणी केली आहे. आम्हाला अपमानित केले आहे. त्यांच्या पाठवणीची वेळ आता झाली आहे,’ असे काँग्रेस जिल्हा कमिटीचे प्रवक्ते अनिल सिंह यांनी सांगितले. ‘आमचे संघटन चांगले आहे. सहा ते साडेसहा हजार कार्यकर्ते कामाला लागले आहेत. इराणी यांच्या काळात सैनिकी स्कूल सुरू झाले. माती परीक्षण विज्ञान केंद्र सुरू झाले. कोंडी फोडण्यासाठी पूल उभारला. हे लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यामुळे भाजपच जिंकणार,’ असा विश्वास अमेठीचे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीराम प्रसाद मिश्रा यांनी व्यक्त केला.