Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देशभरात ‘इंडिया’चे वादळ, मोदी आता पंतप्रधान बनणार नाहीत, लिहून घ्या : राहुल गांधी

10

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘खोट्याची फॅक्टरी’ असलेल्या भाजपने स्वतःच स्वतःला कितीही दिलासा दिला, तरी काहीही फरक पडणार नाही. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की, नरेंद्र मोदी ४ जूननंतर पंतप्रधान होणार नाहीत,’ या शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर बुधवारी नव्याने हल्लाबोल केला.‘मोदी यांनी देशातील संपूर्ण सार्वजनिक क्षेत्र भांडवलदारांना विकले,’ असा आरोप करताना राहुल गांधी म्हणाले की, ‘त्यांनी २२ अब्जाधीशांची १६ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. १६ लाख कोटी रुपये म्हणजे २४ वर्षांचा मनरेगाचा पैसा या २२ लोकांना वाटून टाकला,’ असाही आरोप त्यांनी केला.
आरक्षण संपविण्याचा कॉंग्रेसचा डाव, अंबाजोगाईच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचा आरोप

‘विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’चे वादळ देशभरात सर्वत्र घोंघावत आहे. त्यामुळेच मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत,’ असा दावा करून राहुल गांधी यांनी सांगितले की, ‘स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाने देशाला सांगितले आहे की, ते निवडणूक जिंकले, तर ते राज्यघटना रद्द करून टाकतील. याच राज्यघटनेने भारतातील गरीब जनतेला, मागासलेल्या लोकांना, दलितांना, आदिवासींना, अल्पसंख्यकांना, शेतकऱ्यांना, मजुरांना सारे काही दिले आहे. आज भाजपचे मोठमोठे नेते सांगतात की, जर ते निवडणुकीत जिंकले तर ते (राज्यघटनेचे) पुस्तक फाडून फेकून देतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना आरक्षणासाठी दिलेले शस्त्र, ते हत्यारच त्यांना (भाजपला) हिसकावून घ्यायचे आहे. भाजप व नरेंद्र मोदी सोडा, जगातील कोणतीही शक्ती या पुस्तकाला हात लावू शकत नाही. राज्यघटना फाडण्याचा, फेकण्याचा प्रयत्न केलात, तर देश व काँग्रेस पक्ष तुमचे काय करतो, ते बघाच,’ असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
नरेंद्र मोदींचे काम केवळ अदानी, अंबानींसाठीच, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

‘भाजपला राज्यघटना, आरक्षण संपवायचे आहे’

‘भाजपला राज्यघटना नष्ट करायची आहे. तसेच आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांना देण्यात आलेले आरक्षण रद्द करायचे आहे’, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ओडिशामधील बोलनगीर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. ‘भाजपने ही निवडणूक जिंकली तर सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण केले जाईल आणि देश केवळ २२ अब्जाधीश चालवतील’, असेही राहुल यावेळी म्हणाले.

भाजपकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न : प्रियांका गांधी

निवडणुकीत धार्मिक मुद्दा उपस्थित करून भाजप नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी बुधवारी केला. ‘धर्माच्या नावावर तुम्हाला फसवून ते सत्तेवर येऊ शकतात, हे भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आले आहे. नागरिकांसाठी काम करण्याची गरज नाही असे अगदी नरेंद्र मोदींपासून ते रायबरेलीतील भाजपच्या उमेदवारापर्यंत सर्वच भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच निवडणुकीवेळी धर्माच्या नावावर ते तुमचे लक्ष अन्यत्र वळवतात’, असे प्रियांका म्हणाल्या.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.