Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

धरणांनी गाठला तळ; देशातील १५० प्रमुख धरणांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक

10

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : देशातील प्रमुख दीडशे धरणे व साठवण तलावांच्या पाणीसाठ्यात यंदा मे महिन्याच्या मध्यात लक्षणीय घट झाली असून, सध्या एकूण साठवण क्षमतेच्या केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ३३ धरणांमध्ये सर्वसाधारण साठवण मर्यादेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. यात महाराष्ट्रातील जायकवाडी, मुळा, उजनी (भीमा), भंडारदरा, माणिकडोह आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. उजनी धरणात तर शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) आपल्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये नुकतीच ही माहिती दिली. त्यानुसार देशातील या १५० जलाशयांमध्ये सध्या ४५.२७७ अब्ज घनमीटर (बीसीएम) पाणी शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३ बीसीएम पाणीसाठा घटला आहे. मागील वर्षी १० ते १६ मे या कालावधीतील या जलाशयांतील पाणीसाठी ५७.९९३ बीसीएम होता. यात २० जलविद्युत प्रकल्पांचाही समावेश असून त्यांची एकत्रित साठवण क्षमता ३५.२९९ बीसीएम आहे.

पश्चिम भारतात महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांतील धरणांत ९.६९६ अब्ज घनमीटर उपलब्ध पाणीसाठा आहे. हे प्रमाण एकूण साठवण क्षमतेच्या २६.११ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत पाण्याची उपलब्धता ३२ टक्के होती. दोन्ही राज्यांत ४९ धरणे व साठवण तलाव आहेत.

पूर्वेकडील राज्यांत मात्र गेल्या वर्षीच्या याच हंगामाच्या तुलनेत पाण्याची स्थिती बरी आहे. येथील जलाशयांमध्ये एकूण जलसाठा ६.५३१ बीसीएम आहे. तो त्यांच्या साठवण क्षमतेच्या ३१.९७ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण २८ टक्के होते.

हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान यांचा समावेश असलेल्या उत्तर भारतातील जलाशयांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या २९ टक्के म्हणजे ५.६१८ बीसीएम उपलब्ध पाणीसाठा आहे. वर्षापूर्वी याच जलाशयांत ३७ टक्के पाणी होते. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश असलेल्या मध्य भारतात १५.९३८ बीसीएम उपलब्ध पाणीसाठा आहे. तो एकूण साठवण क्षमतेच्या ३३ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत येथे ४० टक्के पाणी होते. दक्षिण भारतातील जलाशयांमध्ये ७.४९४ बीसीएम पाण्याची उपलब्धता आहे ती एकूण साठवण क्षमतेच्या केवळ १४ टक्के आहे. मागील वर्षी हेच प्रमाण २६ टक्के होते.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! लवकरच होऊ शकते पाणीकपात, धरणांत एवढाच पाणीसाठा शिल्लक
राज्याला कोरड
महाराष्ट्रातील धरणे आणि सध्याचा पाणीसाठा (टक्के)
जायकवाडी २६
भीमा (उजनी) ०
मुळा ४७
दूधगंगा ५९
माणिकडोह ४०
भंडारदरा ४९
ऊरमोडी ११
भाटघर ५२
नीरा देवघर ४२
कन्हेर ४७
पानशेत (तानाजी सागर) ५८

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.