Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोकसभाध्यक्ष निवडणूक अटळ, NDAतर्फे ओम बिर्ला तर INDIAकडून के. सुरेश यांना संधी; कोण बाजी मारणार?

10

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : अठरावी लोकसभा वादळी ठरणार याची चुणूक लोकसभा अध्यक्षांच्या निवडीपासूनच दिसत असून, सत्तारूढ एनडीए आणि विरोधकांमधील संघर्ष मंगळवारी आणखी वाढला. या पदासाठी आज, बुधवारी निवडणूक घेण्याची वेळ येणार हेही स्पष्ट झाले. सत्तारुढ भाजपने माजी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनाच दुसऱ्यांदा एनडीएचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलेले असताना, काँग्रेसने केरळमधील ज्येष्ठ खासदार कोडीकुन्नील ऊर्फ के. सुरेश यांची उमेदवारी जाहीर केली. कायद्याचे पदवीधर असलेल्या या दोघांनीही मंगळवारी दुपारी बारा वाजण्यापूर्वी आपापले उमेदवारी अर्ज लोकसभा महासचिवांकडे दाखल केले. आज, बुधवारी सकाळी ११ वाजता मतदान होणार आहे.

ममतांची आगपाखड

काँग्रेसने के. सुरेश यांची उमेदवारी जाहीर करताच ‘इंडिया’तून मतभेदांच्या ठिणग्या उडाल्या. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सुरेश यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षनेते अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘याबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. दुर्दैवाने हा एकतर्फी घेतलेला निर्णय आहे.’ त्यांच्या या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी ‘जय संविधान’ अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपने आपापल्या ३४० खासदारांना बुधवारी संसदेत पूर्ण वेळ उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा पक्षादेश (व्हिप) बजावला आहे. भाजपने एनडीएच्या सर्व खासदारांना सकाळी साडेदहा वाजता, तर काँग्रेसने आपल्या खासदारांना सकाळी ११ वाजेपर्यंत संसद भवनात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Today Top 10 Headlines in Marathi: दादांचे आमदार परतणार माघारी? मुंबईकरांचा वेळ वाचणार, सकाळच्या दहा हेडलाईन्स

‘विश्वासात घेतले नाही’

के. सुरेश यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय जाहीर केल्यावर राहुल गांधी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘याबाबत भाजपकडून विरोधी पक्षांना विश्वासात घेतले गेले नाही. काँग्रेस अध्यक्षांना (मल्लिकार्जुन खर्गे) राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. आम्ही अध्यक्षांना पाठिंबा देऊ, असे खर्गे यांनी स्पष्टपणे सांगितले. मात्र, संसदीय संकेतानुसार उपाध्यक्षपद विरोधकांना मिळाले पाहिजे. हे आम्ही सांगितल्यावर राजनाथ सिंह यांनी पुन्हा फोन करतो असे सांगितले होते; मात्र त्यांचा फोन आलाच नाही.’ राहुल यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह यांनी म्हणाले, ‘मी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभा अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्यासाठी फोनवर तीन वेळा बोललो आहे. ते (खर्गे) ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांचा आदर करतो.’

दरम्यान, एनडीएचे संख्याबळ व ‘इंडिया’तील विसंवाद पाहता ओम बिर्ला लोकसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास ते पुन्हा या पदावर आरूढ होणारे होणारे भाजपचे पहिले खासदार ठरतील. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यास ते काँग्रेसच्या बलराम जाखड यांच्या विक्रमाची ते बरोबरी करतील. जाखड १९८० ते १९८५ व १९८५ ते १९८९ या काळात सलग दोनदा लोकसभेचे अध्यक्ष होते. याशिवाय पी. ए. संगमा व तेलुगू देसमचे जीएमसी बालयोगी हेही दोनदा लोकसभा अध्यक्ष झाले; परंतु दोघेही प्रत्येकी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.
दादांचे आमदार परतणार माघारी? घरवापसीसाठी पवारांच्या अटी ठरल्या; ‘त्या’ ४ नेत्यांना नो एंट्री?

पेपर स्लिपद्वारे मतदान?

निवडणुकीत विरोधकांनी मतविभागणीचा आग्रह धरल्यास, पेपर स्लिपद्वारे मतदान केले जाईल. नवीन सभागृहात अद्याप सदस्यांना जागावाटप निश्चित करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले सिस्टीम वापरता येत नाही. अध्यक्षांच्या नावाचा प्रस्ताव सभागृहात आवाजी मतदानाने स्वीकारला गेला, तर पीठासीन अधिकारी सदस्याची सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करतील. मात्र, विरोधक मतविभाजनाची मागणी करण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यावर लोकसभेचे कर्मचारी खासदारांना स्लिपचे वाटप करतील आणि या स्लिपमधून मतदान होईल. पेपर स्लिपच्या वापरामुळे निकाल जाहीर होण्यास तुलनेने थोडा वेळ लागतो हे राज्यसभेत अनेकदा दिसले आहे.

‘काँग्रेसचे धोरण दुटप्पीपणाचे’

उपाध्यक्षपद विरोधकांना द्या, मग आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ, असे सांगणारा काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडी दुटप्पी व दांभिकपणे वागत असल्याची टीका भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. नड्डा म्हणाले, ‘ज्यांनी आपल्या राजवटीत व सत्ता असलेल्या राज्यांमध्ये या लोकशाही तत्त्वाचे पालन केले नाही तेच आम्हाला हे सांगत आहेत. तेलंगण, कर्नाटकातील विधानसभांत काँग्रेस सरकारने सभापती आणि उपसभापती दोघेही आपल्याच पक्षाचे केले. पश्चिम बंगालमध्येही ही दोन्ही पदे तृणमूल काँग्रेसकडेच आहेत. तमिळनाडूमध्ये व केरळमध्येही इंडियातील पक्षांनी दोन्ही पदे स्वतःकडेच ठेवली आहेत. त्यांच्या मनात अजूनही आणीबाणीचीच मानसिकता आहे. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने २५ जून १९७५ याच दिवशी आणीबाणी लादून देशाच्या लोकशाहीचा गळा आवळला आणि आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. ज्यांनी अनेकदा राज्यघटनेचा अवमान केला ते स्वतःला राज्यघटनेचे रक्षक म्हणतात हे चमत्कारिक आहे.’

उपाध्यक्षपद विरोधकांना द्या, मग आम्ही एनडीएला पाठिंबा देऊ, असे सांगणारा काँग्रेस पक्ष दुटप्पी आहे. तेलंगण, कर्नाटक विधानसभांत काँग्रेसने सभापती, उपसभापती दोघेही आपल्याच पक्षाचे केले.
– जे. पी. नड्डा, अध्यक्ष, भाजप

संसदीय संकेतानुसार उपाध्यक्षपद विरोधकांना मिळाले पाहिजे. हे आम्ही सांगितल्यावर राजनाथ सिंह यांनी पुन्हा फोन करतो असे सांगितले होते; मात्र त्यांचा फोन आलाच नाही.
– राहुल गांधी, नेते काँग्रेस

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.