Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

26th July Floods: मुंबईतील मुसळधार पावसाने जागवल्या २६ जुलैच्या महापुराच्या आठवणी, २००५मध्ये काय झालं होतं?

8

मुंबई : दरवर्षी २६ जुलै आला की, सन २००५मध्ये या तारखेला झालेल्या विक्रमी पावसाची आठवण मुंबईकरांना होते. मात्र, यंदा केवळ तारीख जवळ आली म्हणून नाही, तर गुरुवारी, २५ जुलैला पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातल्याने त्या भीतीदायक आठवणी जाग्या झाल्या. मुंबईत अनेक ठिकाणी दुपारी १ वाजेपर्यंत पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर पावसाने काहीशी उसंत घेतली. मात्र, अधून-मधून कोसळणाऱ्या जोरदार सरी मुंबईकरांच्या चिंतेत भर घालणाऱ्या होत्या.
२६ जुलै २००५ हा दिवस आजही मुंबईकरांना भीती घालणारा आहे. सर्वात मोठी जीवितहानी करणारा हा प्रलयंकारी पाऊस होता. अवघ्या २४ तासांत १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस पडलेला. हजारो घर उद्ध्वस्त झाली. एक हजाराहून अधिक लोकांनी जीव गमवले. या पावसात ३७ हजार रिक्षा, ४००० टॅक्सी आणि ९०० बेस्ट बसेसचं नुकसान झालं होतं. कोटींचं नुकसान झालं होतं. यंदा केवळ हीच तारीख जवळ आली म्हणून नाही, तर गुरुवारी, २५ जुलैला पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातल्याने त्या भीतीदायक आठवणी जाग्या झाल्या.

मुंबईमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. स्वयंचलित केंद्रांवर झालेल्या नोंदींनुसार, बुधवारी सायंकाळी ७ ते गुरुवारी सायंकाळी ७ या कालावधीत दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालवणी, जोगेश्वरी, के पश्चिम, मरोळ, ए विभाग, चेंबूर, ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन, बी विभाग येथे १२० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सर्वाधिक नोंद मालवणी येथे १८९ मिलीमीटर इतकी झाली. दिवसभरातही पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे मुंबईतील अनेक केंद्रांवर ७० ते १०० मिलीमीटरदरम्यान पाऊस नोंदला गेला. सकाळी ७ नंतरच्या १२ तासांमध्येही मुसळधार पावसाने मुंबईत सर्वदूर हजेरी लावली. ‘गुरुवारी दिवसभरात शिवडी कोळीवाडा येथे सर्वाधिक म्हणजे ८७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली’, अशी माहिती महापालिकेने दिली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथे सकाळी ८.३० ते ५.३० या वेळेत ४५, तर सांताक्रूझ येथे ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Rain News: मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, खबरदारी घेण्याचे आवाहन, जाणून घ्या २६ जुलैला पावसाचा अंदाज…
महामुंबईत २५ जुलैच्या सकाळपर्यंत २४ तासांत पालघर जिल्ह्यातील मोखाडा केंद्रावर २८० मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. ठाणे जिल्ह्यात मुरबाड येथे २२८, तर लोणावळा केंद्रावर ३५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात महामुंबई, तसेच घाट परिसरात सातत्याने पडणाऱ्या पावसाने गुरुवारी सकाळीही उसंत घेतली नाही. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली.

पश्चिम बंगालवर आणि लगतच्या बांगलादेशवर असलेल्या चक्रीय वातस्थितीमुळे, तसेच पश्चिमेकडून येणाऱ्या सक्रिय वाऱ्यांमुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले. दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती कायम आहे. तसेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे निर्माण झालेली प्रणाली या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून उत्तर कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अचानक वाढल्याचे प्रादेशिक हवामान विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रणालीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही पावसाचा जोर काही काळ कायम राहिल्याने त्याची तीव्रता वाढवल्याचेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवसभरासाठी अपेक्षित असलेला यलो अॅलर्ट दुपारच्या वेळी रेड अॅलर्टमध्ये बदलण्यात आला.

आज काय परिस्थिती?

गुरुवारचा पावसाचा जोर आज, शुक्रवारी थोडा कमी होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यांनाही आज, शुक्रवारी ऑरेंज अॅलर्ट असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मात्र रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कोल्हापूर आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये आज, शुक्रवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.