Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mumbai News: ‘गुमास्ता’द्वारे अवैध धंदे; वरळीतील हत्येमुळे स्पा अन् मसाज पार्लर पुन्हा चर्चेत

12

मुंबई : वरळी येथील स्पामध्ये झालेल्या हत्येनंतर मुंबईतील स्पा आणि मसाज पार्लर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्पा आणि मसाज पार्लरसाठी कोणत्याही विशेष परवानगीची गरज लागत नसून, केवळ गुमास्ता लायसन्सवर मसाजच्या नावाखाली गैरधंदे चालविले जात आहेत. गैरप्रकारामुळेच खंडणीखोरांचे फावत असून त्यातून हत्येसारखे गंभीर गुन्हे होत आहेत. पार्लरच्या नावाने हे छुपे गैरधंदे चालू असल्याने पोलिसांनाही कारवाई करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते.वरळी येथील ‘सॉफ्ट टच’ स्पामध्ये खबरी आणि खंडणीचा आरोप असलेल्या गुरू वाघमारे याची बुधवारी हत्या करण्यात आली. त्याच्या हत्याप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये दोघे स्पा चालक आहेत. वाघमारे याच्या त्रासाला कंटाळूनच त्याचा काटा काढण्यात आला. स्पामध्ये सर्व काही कायदेशीर सुरू असते, तर वाघमारे याची धास्ती स्पा चालकांनी घेतली नसती, मात्र गैरधंदे केले जात असल्याने वाघमारे त्यांच्याकडून पैसे उकळत होता, असे पोलिस तपासातून समोर आले आहे.

‘सॉफ्ट टच’ स्पामधील या हत्येनंतर मुंबईतील स्पा आणि मसाज पार्लर चर्चेचा आणि तितकाच चिंतेचा विषय ठरला आहे. स्पा आणि मसाज पार्लरसाठी विशेष परवानग्या आणि कडक नियमावलीची गरज असल्याचे एका सहायक पोलिस आयुक्ताने सांगितले. दुकानासाठी लागणारे केवळ गुमास्ता लायसन्स घेऊन त्याधारे मसाज आणि स्पा चालविले जातात, असे हा अधिकारी म्हणाला.

Mumbai Crime: वरळी स्पा हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, गर्लफ्रेंडबाबत धक्कादायक माहिती उघड, आणखी एकाला अटक
व्यावसायिक इमारती, निवासी वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांकडून स्पा किंवा मसाज पार्लरचा होत असलेला त्रास, त्यात सुरू असलेले गैरप्रकार याबाबतच्या तक्रारी येत असतात. मात्र केवळ तक्रारींवर कारवाई न करता छापा टाकण्यापूर्वी पोलिसांना शहानिशा करावी लागते. खबरी, एखाद्या व्यक्तीला बोगस ग्राहक बनवून सापळा टाकला जातो आणि गैरप्रकार करतानाच रंगेहाथ पकडले जाते. अशा प्रकारच्या कारवाया सहज करता येत नसल्याचे एका पोलिस निरीक्षकाने सांगितले. पुरुषाला महिला आणि महिलांना पुरुषाने मालिश करणे, मसाजच्या नावाखाली देहविक्रय करणे अशा तक्रारी सर्रास येत असतात. मात्र, त्यावर कारवाई करणे, आरोपींना अटक करणे, न्यायालयातून कोठडी मिळविणे यासाठी पुरावे जमा करण्याचे मोठे आव्हान असते, असेही हा अधिकारी म्हणाला.

अंगदुखी आणि त्वचा चमक

मसाज पार्लर हे अंगदुखी, अवयव दुखी यासाठी मालिश आवश्यक असलेल्या ग्राहकांसाठी असतात. वेगवेगळ्या पद्धतीने या पार्लरमध्ये मालिश केले जाते आणि त्यासाठी यामध्ये पारंगत कर्मचारी कामाला ठेवले जातात. दुसरीकडे, स्पामध्ये त्वचा तजेलदार, चमकविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत स्पा आणि मसाज पार्लरचा सुळसुळाट आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.