Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
खजूराच्या शेतीचं अर्थकारण काय?
अनंत जावळे हे कृषी विभागामध्ये उच्च पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवला. आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यातच त्यांना खजूर शेती करण्याचा विचार आला. २०१६ मध्ये त्यांनी आपल्या सहा एकर जमिनीमध्ये खजूर पिकाची लागवड केली. २०२४ पर्यंत त्यांच्याकडे आता २४ एकर जमिनीवर खजूर शेती केली जाते. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आणि त्यांची मुलं देखील त्यांना या कामांमध्ये साथ देतात, मदत करतात.
खजूर शेतीचे अर्थकारण सांगताना आनंद जावळे सांगतात, की एका एकरमध्ये खजुराची ६० झाडं बसतात. एका झाडाला दोन क्विंटल खजुराचं पिक निघतं. एक झाड १५ ते २० हजार रुपये खजुराच्या माध्यमातून उत्पन्न मिळवून देतं. ६० झाडांचा विचार केला, तर नऊ लाख रुपयांचं उत्पन्न या खजुराच्या माध्यमातून मिळतं. खजुराची लागवड केल्यानंतर सुरुवातीला एकरी तीन लाख रुपये खर्च येतो. खर्च वजा करता पाच ते साडेपाच लाख रुपयाचं उत्पन्न या खजूर पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळतं.
खजूर पिकामध्ये आंतरपिकाचाही फायदा
पुढे बोलताना आनंद जावळे म्हणतात, की या खजूर पिकामध्ये आंतरपीक देखील घेता येतं. आठ वर्षांपूर्वी लावलेल्या खजूर पिकामध्ये त्यांनी सध्या हळदीचं आंतरपीक घेतलेलं आहे. तर चार वर्षांपूर्वी लावलेल्या खजुराच्या पिकामध्ये सध्या सोयाबीनचं पीक घेण्यात आलं आहे. आंतरपिकामुळे खजुराच्या झाडाला कसल्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही.
खजुराचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असलं, तरी त्याचं मार्केटिंग फार कठीण असल्याचं अनंत जावळे सांगतात. कारण खजुराचं पीक हे जून महिन्यात येतं आणि या वेळेसच शेतकरी आपल्या शेतीमध्ये पेरणीसाठी गुंतलेला असतो. या दिवसात मजूर देखील कमी प्रमाणात मिळतात. खजूर हे पीक नाशवंत असल्याने याची विल्हेवाट लवकरात लवकर लावावी लागते. ज्याला मार्केटिंग जमली, त्याला या खजूर पिकातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होतो असं देखील ते म्हणाले.
अनंत जावळे यांनी या वर्षापासून खजूर पिकासाठी कोल्ड स्टोरेजची उभारणी केली आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणावर खजुराचं पीक काढून ठेवण्यात येत आहे. येणारे चार ते पाच महिने कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेले खजूर विकणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या अनंतराव जावळे रिटेल स्वरूपातही खजूर परभणी जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये विकत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या खजुराला सध्या दुसऱ्या राज्यांमधून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, दिल्ली यासारख्या ठिकाणी यांनी पिकवलेले खजूर विक्रीसाठी पाठवले जातात.