Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोल्हापूरकरांच्या डोळ्यातून अश्रू अनावर; शाहू महाराजांची आठवण असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास

11

कोल्हापूर (नयन यादवाड): कला नगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरातून आजतागायत हजारो कलाकार सिनेसृष्टीला मिळाले. आणि यातील प्रत्येक कलाकार एकदा का होईना संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आपली कला सादर केली. कलाकारांना हक्काच व्यासपीठ मिळावे या हेतूने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या या नाट्यगृहाने शंभर वर्षांहून अधिक काळ मायबाप रसिक प्रेक्षकांची सेवा केली. मात्र काल रात्री काळाने घाला घातला आणि हे नाट्यगृह आगीत भस्मसात झाले. दररोज हजारो प्रेक्षकांच्या टाळ्यांनी कलाकारांचं होणार सन्मान आणि कलाकारांच पोट भरणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाची आज सकाळी झालेली अवस्था प्रत्येक कोल्हापुरकरांच्या आणि कलाकाराच्या डोळ्यातून पाणी काढणारा आहे. खरतर आज केशवराव भोसले यांची जयंती आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती वर्षातच नाट्यगृह जळताना बघून ‘हे विधात्या, तू इतका कठोर का झालास?…’ हे ‘नटसम्राट’मधील हताश वाक्य कलाकारांच्या तोंड येताना ऐकायला मिळत आहे.

केशवराव भोसले यांची आज जयंती

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा इतिहास आहे.अनेक अजरामर नाटकांचे प्रयोग येथे झाले. अनेक कलाकार येथे घडले. खरंतर केशवराव भोसले यांचे आज जयंती मात्र याच्या पूर्वसंध्येलाच त्यांच्या नावाने असलेलं नाट्यगृह आगीत भस्म झाले. नाट्यगृह जळताना पाहून कलाकार ओक्साभोक्षी रडत होते. केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आज आणि उद्या या सभागृहात महाराष्ट्र सरकारच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या साठी येथे कलाकारांचा सराव देखील सुरू होता. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं. पण तत्पूर्वीच ही दुर्घटना घडल्यानं कोल्हापूरकरांना अश्रू अनावर झाले आहेत.
Vinesh Phogat: विनेशला रौप्यपदक मिळणार की नाही? आली मोठी अपडेट; लवादाने स्पष्टपणे सांगितले की…

काय आहे केशवराव भोसले नाट्यगृहात इतिहास

केशवराव भोसले नाट्यगृह हे एक विशेष पद्धतीने बांधण्यात आले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज 1902 साली युरोप दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी तेथील नाटकांच्या सादरीकरणाची मोठमोठी नाट्यगृहे, ॲम्पी थिएटर त्यांनी पाहिलं आणि आपल्या कोल्हापुरातदेखील असे एखादे नाट्यगृह असाव अशी इच्छा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मनात निर्माण झाली. ते रोमवरून येताच तशा पद्धतीचे नाट्यगृह तयार करण्यासाठी 9 ऑक्टोंबर 1913 साली पायाभरणी केली आणि 14 ऑक्टोंबर 1915 साली शाहू महाराजांचे सुपुत्र युवराज राजाराम महाराजांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर या नाट्यगृहाचे उद्घाटन केले. नाट्यगृहाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकाला व्यासपीठावरील कला कोणत्याही अडथळा शिवाय पाहता यावी यासाठी कोणतेही खांब न लावता दगडी बांधकामाचे भक्कम असे भव्यदिव्य नाट्यगृह उभे राहिले. शिवाय स्टेजच्या खाली पाण्याचे झरे तयार करण्यात आले होते. या विहिरीमुळे कलाकारांचा आवाज घुमत नव्हता. अकॉस्टिक सिस्टममुळे कोणतेही तंत्र नसलेल्या त्या काळात सगळीकडे स्पष्ट संवाद ऐकू येत होता.

1921 साली ॲम्पी थिएटर ही तयार केलं

त्या काळात मुंबईमधील बॉम्बे थिएटरसारख्या मोठ्या नाट्यगृहा नंतर भारतातील आणि कोल्हापुरातील हे एकमेव मोठं नाट्यगृह होतं.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना कुस्तीचे देखील आवड असल्याने याच नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजूस पश्चिमेला भव्य दिव्य खासबाग मैदान देखील त्यांनी उभं केलं होतं. या खासबाग मैदानात अनेक कुस्त्या व्हायच्या. यात खासबाग मैदानातून अनेक महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी आजपर्यंत या देशाला मिळाले.तर राजर्षी शाहू महाराजांनी खुल्या रंगमंचावर कलाकारांना नाटक सादर करता यावे. यासाठी 1921 साली ॲम्पी थिएटर ही त्यांनी तयार केले. त्यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘मृच्छकटिक’ नाटकाने या ॲम्पी थिएटरचे उद्घाटन झाले होते यास स्वत: शाहू महाराज उपस्थित होते. शाहू महाराज आणि केशवराव भोसले यांच्या मैत्रीची खास घनिष्ठ संबंध होते. यानंतर केशवराव भोसले यांनी अनेक नाटकांचे प्रयोग येथे सुरू केले यामुळे मराठी रंगभूमीला एक सुवर्णकाळ आला होता. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या स्थापनेची घोषणा या नाट्यगृहात केली होती. बालगंधर्व, अच्युतराव कोल्हटकर, कानेटकर, शिलेदारांची संगीत नाटके तसेच अनेक कलाकारांनी हा रंगमंच गाजवला. रंगमंचावर कलायोगी जी. कांबळे यांनी केलेले शाहू महाराजांचे चित्र होते. नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालनात रवींद्र मेस्त्री यांनी केलेला बाबूराव पेंढारकर यांचा पुतळा होता. तर 1957 साली बाळासाहेब देसाई बांधकाम मंत्री झाले तेव्हा त्यांनी या पॅलेस थिएटरचं नाव बदलून ते ‘केशवराव भोसले नाट्यगृह’ असे केले. यानंतर 1984 साली देखील या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आलं होतं मात्र या नूतनीकरणानंतर अनेक समस्या येथे निर्माण होऊ लागल्या होत्या. तर 2014 साली देखील तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून महानगरपालिकेने अद्यावत साऊंड सिस्टिम बसवले होते तर गेल्या वर्षभरापूर्वी त्याला त्या नावाला ‘संगीतसूर्य’ जोडले गेले. मात्र आज राजर्षी शाहू महाराजांच प्रतीक असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची राख रांगोळी झाली आहे. हे पाहून अनेक कोल्हापूरकरांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत आहेत.

कालपर्यंत लाईट कॅमेरा मध्ये असलेल नाट्यगृह आज…

गेल्या अनेक दशकांपासून या नाट्यगृहावर हजारो कुटुंब जगत आहेत. काहीजण तर आपलं लहानपण याच नाट्यगृहात घालवल आणि आता उतार वयात देखील येथेच ते काम करतात. अनेकांची दुसरी पिढी देखील येथे काम करत आहे. काल रात्री नऊच्या सुमारास लागलेल्या या आगीची बातमी वाऱ्यासारखी सगळ्या कलाकारांपर्यंत आणि कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचली. सुरुवातीला अनेकांना विश्वासच बसला नाही. मात्र समाज माध्यमातून याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकारांच्या पायाखालची जमीन घसरली. अनेक जण त्वरित केशवराव भोसले नाट्यगृहाकडे धाव घेतली आणि आपल्या डोळ्यासमोर आपलं घर जळताना पाहून डोळ्यातून अश्रू अनावर होत होते.

काल संध्याकाळपर्यंत अनेक प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आणि लाईट कॅमेरा या मध्ये चमकणारा नाट्यगृहात आज सकाळी केवळ सर्वत्र कोळसा, जळलेल्या खुर्च्या आणि धुमसत असलेल धूर पाहताना कलाकारांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. आज सकाळपासून अनेक नेतेमंडळी येथे येऊन केशवराव भोसले सभागृहाची पाहणी करून गेले अनेक जण मदत देखील देऊ लागले आहेत. आज ना उद्या हे सभागृह पुन्हा दिमाखात उभे राहील मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आठवण असलेल्या सभागृहातील आठवणी पुन्हा येणार नाहीत, अशी प्रतिक्रिया येथील प्रत्येक कलाकार आणि कोल्हापूरकर देत होतं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.