Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Eco Sensitive Zones: नाशिक जिल्ह्यात २०२ गावे ‘इको सेन्सेटिव्ह’; ‘या’ कामांवर येणार बंदी, कोणत्या गावांचा समावेश?

14

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महाराष्ट्रासह सहा राज्यांतील विस्तारलेल्या पश्चिम घाटाचे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) निश्चितीच्या सहाव्या अधिसूचनेत नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २०२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. संवेदनशील क्षेत्रांच्या यादीत समाविष्ट केलेल्या गावांमध्ये नवीन खाणकाम, उत्खनन आणि वाळू उपसा या प्रकल्पांवर बंदी राहणार आहे. या भागात नवीन वीजनिर्मिती, धरण उभारणी, औद्योगिक प्रकल्पांवर निर्बंध लागू राहणार आहेत.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या खाणकाम प्रकल्पांना पाच वर्षांपेक्षा जास्त काळ प्रकल्प सुरू ठेवता येणार नाहीत. पर्यावरणीयदृष्ट्या हानीकारक प्रकल्पांना या भागांमध्ये परवानगी मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिक तालुका वगळून आजूबाजूच्या आठ तालुक्यांचा ‘इको सेन्सिटिव्ह’मध्ये समावेश असून, यात सुरगाणा (५० गावे), त्र्यंबकेश्वर (४६ गावे), पेठ (३५ गावे), कळवण (३३ गावे), बागलाण (२० गावे), इगतपुरी (८ गावे), दिंडोरी (५ गावे) आणि सिन्नर (५ गावे) अशी २०२ गावे संवेदनशील क्षेत्र म्हणून प्रस्तावित आहेत. अधिसूचनेमध्ये गावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पश्चिम घाट जैवविविधता तज्ज्ञ समितीने अहवाल केंद्र सरकारला देऊन दहा वर्षे उलटली आहेत. सराकरने तो स्वीकारला नाहीच; पण अहवालाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या कस्तुरीरंगन समितीचा अहवाल येऊनही सात वर्षे झाली, तरी केंद्र सरकार आणि पश्चिम घाटाचा समावेश असलेल्या सहाही राज्यांनी अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी केलेली नाही. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान मंत्रालयाकडून या अहवालावर एकामागोमाग अधिसूचना जाहीर केल्या जात आहेत. केरळमध्ये झालेल्या मोठ्या अपघातानंतर सरकारने आता पाचवे सुधारित परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यात सर्वाधिक संवेदनशील क्षेत्र कर्नाटकमधील असून, त्या पाठोपाठ महाराष्ट्र असून,२५१५ गावांचा संवेदशील गावे म्हणून समावेश करण्यात आला आहे. यातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (२०२), धुळे (७) आणि नंदुरबार (२) या जिल्ह्यांचा समावेश असून, उत्तर महाराष्ट्रातील २११ गावांचा संवेदशील क्षेत्रांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

काही गावे वगळण्याची मागणी

महाराष्ट्रातील एकूण १७ हजार ३४० चौरस किमी क्षेत्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी २०२२ मध्येही एक अधिसूचना प्रसिद्ध करीत राज्यातील २,१३३ गावांचा समावेश संवेदनशील क्षेत्रात केला होता. मात्र, राजकीय नेत्यांनी त्यातील ३८८ गावे वगळण्याची मागणी केली होती. यासाठी कस्तुरीरंगन समितीच्या अहवालाचा फेरअभ्यास करणारे निवृत्त वरिष्ठ वन अधिकारी संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती २०२३ मध्ये नेमण्यात आली. या समितीने आक्षेप घेण्यात आलेल्या संवदेनशील क्षेत्रांची पाहणी केली. लोकांकडून त्यांची बाजू ऐकून घेतली. या समितीचा अहवाल सप्टेंबर अखेरपर्यंत येणे अपेक्षित आहे. संवेदनशील क्षेत्रातील गावे वगळणे, वाढविणे याबाबतचे सर्व अधिकार समिती आणि केंद्र सरकारकडे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास अखेर मंजुरी; उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली माहिती, असा आहे प्रकल्प…
उत्तर महाराष्ट्रातील संवेदनशील गावे
नाशिक २०२
धुळे ७
नंदुरबार २

नाशिकमधील संवेदनशील गावे
तालुका गावे

सुरगाणा ५०
त्र्यंबकेश्वर ४६
पेठ ३५
कळवण ३३
बागलाण २०
इगतपुरी ८
दिंडोरी ५
सिन्नर ५

यादीत समाविष्ट गावांमध्ये या कामांवर येणार बंदी

– नवीन खाणकाम, उत्खनन आणि वाळू उपसा या प्रकल्पांवर बंदी.
– नवीन वीज निर्मिती, धरण उभारणी, औद्योगिक प्रकल्पांवर निर्बंध.
– सध्या अस्तित्त्वात असलेल्या खाणकाम प्रकल्पांना पाच वर्षांपेक्षा जास्त काळ प्रकल्प सुरू ठेवता येणार नाहीत.
– पर्यावरणीयदृष्ट्या हानीकारक प्रकल्पांना परवानगी मिळणार नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.