Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
खासदार वसंत चव्हाणांच्या ४६ वर्षांच्या राजकीय प्रवासाची अखेर, नांंदेडवर शोककळा; अशोक चव्हाणही हळहळले
वसंत चव्हाण हे माजी आमदार स्वर्गीय बळवंत चव्हाण यांचे सुपुत्र होते. १९७८ साली त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. १९७८ साली नायगाव ग्रामपंचायतीत त्यांची सरपंच पदावर निवड झाली. १९७८ ते २००२ असे सलग २४ वर्षे त्यांनी सरपंचाची धुरा सांभाळली. त्यानंतर १९९० मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि विजय देखील मिळवला. १९९० ते २००२ अशा दोन कार्यकाळात वसंत चव्हाण हे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले. त्यानंतर २००२ साली राष्ट्रवादीकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत त्यांनी अपक्ष म्हणून नायगाव बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर त्यांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दर्शवत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. वसंत चव्हाण हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष देखील राहिले होते. वसंतराव चव्हाण यांचे नायगाव-बिलोली मतदारसंघात चांगले वर्चस्व होते. शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची राज्यभरात ओळख होती. त्यांच्या निधनाने नांदेडवर शोककळा पसरली आहे.
मंगळवारी होणार अंत्यसंस्कार
खासदार वसंत चव्हाण यांचे आज हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान त्यांचे पार्थिव सोमवारी सायंकाळी हैदराबाद येथून नायगाव येथे आणले जाणार आहे. मंगळवार (२७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता नायगाव शहरातील हनुमान मंदिरच्या बाजूला त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती चव्हाण कुटुंबीयांकडून देण्यात आली.
काँग्रेस अध्यक्षांसह नेत्यांनी वाहिली आदरांजली
वसंत चव्हाण यांच्या निधनाने काँग्रेसच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही वसंत चव्हाण यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक असणाऱ्या शांत आणि संयमी नेतृत्वाला जड अंत:करणाने श्रद्धांजली, अशा शब्दांत काँग्रेस नेत्यांनी आदरांजली वाहिली.
अशोक चव्हाणही हळहळले
वसंत चव्हाणांचे राजकीय सोबती नांदेडमधील नेतृत्व असणारे भाजप खासदार अशोक चव्हाणही वसंत चव्हाणांच्या निधनाने हळहळले आहेत. ज्येष्ठ नेते व खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देऊन आज ना उद्या ते बरे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आज पहाटे काळाने त्यांच्यावर दुर्दैवी घाला घातला. त्यांच्या निधनाने ग्रामीण भागाची नाडी उत्तमपणे जाणणारे एक संयमी, विनम्र व अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. खा. वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.