Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ganeshotsav 2024: गणपती बाप्पा मोरया! चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या गणरायाचा आजपासून जयघोष
Ganeshotsav 2024 festival of enlivenment: चैतन्य आणि मांगल्याची द्वाही फिरवणाऱ्या तसेच, विघ्नहर्त्याच्या रूपाने येऊन सकारात्मकता पेरणाऱ्या गणरायांचा उत्सव आज, शनिवारपासून सुरू होत आहे. मुंबईसह राज्यभरातील भक्त गणरंगात न्हाऊन निघाले असून आजपासून सर्वत्र मोरयाचाच जयघोष चालणार आहे.
हरितालिका तृतीयेला अर्थात गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी अनेक घरांमध्ये गणरायाचे आगमन होते. त्यासाठी शुक्रवारी सकाळपासूनच घराघरांमध्ये आणि छोट्या-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये लगबग सुरू होती. बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी गाडीची व्यवस्था करणे, घरी सजावटीवर शेवटचा हात फिरवणे, भाजी आणि वाणसामानाची तरतूद करणे, फुले आणि आयत्या वेळी सुचलेले सजावटीचे सामान आणण्यासाठी बाहेर पडणे, अशा गोष्टींनी बहुतांश मुंबईकरांचा शुक्रवार व्यापला होता.
आजचे पंचांग 7 सप्टेंबर 2024: श्रीगणेश चतुर्थी, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
श्री गणेशाच्या सुबक मूर्ती घडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लालबाग-परळ-चिंचपोकळी भागातील चित्रशाळांबाहेर शुक्रवारी प्रचंड गर्दी होती. भाविक आपल्या घरातील किंवा सार्वजनिक मंडळातील मूर्ती आणण्यासाठी आपले वाहन ठरवूनच येत होते. मूर्ती आणण्यासाठी आत गेलेले लोक आणि बाहेर थांबलेल्या गाड्या, यामुळे दिवसभर आणि संध्याकाळीही या भागात प्रचंड गर्दी होती. त्यातच मध्येच पावसाच्या सरी येत असल्याने बाप्पा पावसात भिजू नये यासाठी लोकांची तारांबळ सुरू होती. त्याशिवाय मूर्ती घेतल्यानंतर ती गाडीपर्यंत वाजतगाजत नेण्याकडे लोकांचा कल होता. त्यासाठी छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये ताशावाले सज्ज होते. काही जणांनी सनई-चौघडेही आणले होते. चित्रशाळेपासून गाडीपर्यंत मूर्ती वाजतगाजत नेली की, आपली बिदागी घेऊन पुढल्या यजमानांच्या शोधात हे वादक फिरत होते. मूर्ती आणण्यासाठी काही जण पायीदेखील आले होते. त्यांच्यासह त्यांच्या घरापर्यंत हे वादक वाजवत जात होते.
दादर पश्चिमेकडे काही वेगळे चित्र नव्हते. मुंबईच्या उपनगरांमधीलच नाही, तर पार डोंबिवली, ठाण्यापासून फुलांची, सजावटीच्या सामानाची खरेदी करण्यासाठी लोकांनी दादरकडे धाव घेतली होती. त्यामुळे दादर पश्चिमेला कबुतरखान्याजवळ असलेल्या रेल्वेच्या पुलावरून खाली फक्त छत्र्यांची गर्दी दिसत होती. दादर रेल्वे स्थानक ते कबुतरखाना हे एरव्ही दोन मिनिटांचे अंतर पायी कापण्यासाठी दहा मिनिटे लागत होती. या सर्व गर्दीत एक वेगळाच उत्साह संचारला होता. काही जणांकडे पुढील दीड दिवस, काहींकडे सात दिवस, तर काही घरांमध्ये दहा दिवस बाप्पा वास करणार, याचा आनंद लोकांच्या डोळ्यांमधून निथळत होता. ताशाचा तडतड आवाज, फुलांचा गंध आणि सजावटीची चकाकी याने संपूर्ण मुंबई गणेशमय झाली आहे.