Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Hadapsar Vidhan Sabha Politics: राजकीय वर्तुळांचे लक्ष लागून राहिलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यादी गुरुवारी सायंकाळी जाहीर झाली. यातच हडपसर विधानसभा मतदारसंघाबाबत उत्सुकता होती. हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना प्रशांत जगताप आणि चेतन तुपे एकाच पक्षात असून एकमेकांचे स्पर्धक होते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. तर चेतन तुपे यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीची वाट धरली. त्यामुळे सर्वच मतदारसंघातील राजकीय समीकरणांसोबतच याही मतदारसंघात ते बदलले. या संधीचा फायदा घेत दस्तूरखुद्द शरद पवारांनी हडपसर मतदारसंघासाठी चेतन तुपे यांच्याविरोधात आपला खंदा शिलेदार उतरवला आहे. त्यामुळे हडपसर विधानसभेची यंदा रंगत येणार यात मात्र शंका नाही.
हडपसरमध्ये यंदा उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली होती. मात्र पवारांशी एकनिष्ठ असलेल्या शिलेदाराला संधी देण्यात आली आहे. प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. याशिवाय त्यांनी महापौर पद देखील भूषवले आहे. तर चेतन तुपे हे हडपसरचे विद्यमान आमदारा आहेत. दोन्ही उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी आहे. याच राजकीय प्रवासात दोघे एकमेकांचे स्पर्धक असल्याच्या अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. मात्र आता पहिल्यांदाच हे दोन्ही स्पर्धक विधानसभेच्या आखाड्यात समोरासमोर उभे ठाकणार आहेत. यात कोणाचा विजय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.