Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

धक्कादायक निकालाचा धसका! महायुतीसाठी धोक्याची घंटा, भाजपला आव्हान कुणाचे?

7

Bhiwandi Vidhan Sabha: महाविकास आघाडीची ताकद फारशी नसताना आणि महायुतीच्या पक्षातील आमदारांची संख्या जास्त असूनही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झाला होता. कें

महाराष्ट्र टाइम्स
bhiwandi2

ठाणे : शहरी आणि ग्रामीण भाग असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, शहापूर, कल्याण पश्चिम, मुरबाड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. त्यापैकी शिवसेना, भाजपचे प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे एक आणि महाविकास आघाडीमधील समाजवादी पार्टीचे एक आमदार आहेत.

महाविकास आघाडीची ताकद फारशी नसताना आणि महायुतीच्या पक्षातील आमदारांची संख्या जास्त असूनही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झाला होता. केंद्रीय राज्यमंत्री असतानाही पाटील यांना मतदारांनी नाकारल्याने लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला धक्कादायक निकालाचा सामना करावा लागणार का, असा प्रश्न आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (शप) सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा असून एकंदरित बदललेल्या राजकीय परिस्थिती पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीबरोबर महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे.

महायुतीसाठी धोक्याची घंटा
भिवंडी ग्रामीण

ठाणे जिल्ह्यात कायमच शिवसेनेचा दबदबा राहिला आहे. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे आमदार असून २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले होते. गेल्या निवडणुकीमध्ये झालेल्या तिरंगी लढतीमध्ये मोरे यांना ८३ हजार ५६७ मते मिळाली. त्यांना पक्षाकडून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले जाण्याची दाट शक्यता आहे. या मतदारसंघात ३ लाख ३५ हजारांपेक्षा जास्त मतदार असले तरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे पराभूत उमेदवार कपिल पाटील यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्यापेक्षा केवळ ८ हजार अधिक मतदान झाले होते. दोघांनाही पडलेल्या मतदानांमध्ये फारसा फरक नसल्याने ही एकप्रकारे महायुतीच्या उमेदवारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आजही तितका विकास झालेला नसल्याने जनतेमध्ये नाराजीचे वातावरण असून निवडणुकीमध्ये हाच मुद्दा महाविकास आघाडीसह अन्य पक्षांच्या उमेदवाराकडून उचलून धरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदारसंघामध्ये वनिता कथोरे यांना उमेदवारी दिली आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे उमेदवाराला ३९ हजार मते मिळाली होती. २०१४मध्येही २५ हजार मते घेणाऱ्या मनसेसाठी हा मतदारसंघ अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या (उबाठा) वाट्याला गेला आहे. ठाकरे यांच्या पक्षाकडून काही इच्छुक उमेदवारांपैकी महादेव घाटाळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
जो भावाचा नाही झाला, तो मतदारांचा काय होईल? केदा आहेर यांचा आमदार डॉ. राहुल यांना घरचा आहेर
नाराजी कुणाच्या पथ्यावर?
शहापूर

दरवर्षी गावपाड्यातील जनतेला उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईमुळे कायमच चर्चेत असलेल्या शहापूर विधानसभा मतदारसंघातील दौलत दरोडा हे ठाणे जिल्ह्यातील एकमेव आमदार महायुतीमधील राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आहेत. या मतदारसंघामध्ये यावेळी २ लाख ८८ हजारांपेक्षा जास्त मतदार असून मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ७६ हजार ५३ मते मिळवत दरोडा विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे पांडुरंग बरोरा यांचा पराभव केला होता. शहापूरमध्ये महायुतीचा आमदार असतानाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ७४ हजार ६८९ मतदान अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना झाले होते. दुसऱ्या स्थानावर सुरेश म्हात्रे आणि तिसऱ्या स्थानावर भाजपचे कपिल पाटील होते. लोकसभेला या मतदारसंघात भाजपला मतदान कमी झाल्याने पदाधिकारी नाराज असून उघडपणे बोलून दाखवत आहेत. भाजपने या मतदारसंघावर दावा केला असून भाजपचे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरनक निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. शहापूर तालुक्यातील भाजपचा दबदबा पाहता ही जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली होती. परंतु, विद्यमान आमदार दरोडा यांची पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली असून त्यांना अगोदरच ‘एबी’ फॉर्म देण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या या उमेदवाराला भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा फटका बसणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीत जागावाटपामध्ये हा मतदारसंघ जागा राष्ट्रवादी कॉँग्रेस (शप) पक्षाला जाण्याची जोरदार चर्चा असून गेल्यावर्षी शिवसेनेतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. बरोरा यांना पक्षाकडून कामाला लागण्याचे आदेश मिळाल्याचे कळते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदार संघामध्ये हरिश्चंद्र खांडवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शहापूरमध्ये निवडणूक चुरशीची होईल, हे मात्र नक्की.
भाजपला शिवसेनेची टक्कर, आव्हाडांना आव्हान शिष्याचे; तर भाजपपुढे बंडखोरांची डोकेदुखी, कल्याण सांगा कुणाचे?
भाजपला आव्हान कुणाचे?
भिवंडी पश्चिम

भाजपने तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विद्यमान आमदार महेश चौघुले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून भाजपच्या पहिल्या यादीमध्येच चौघुले यांच्या नावाचा समावेश होता. या मतदारसंघामध्ये ३ लाख ३२ हजारांहून अधिक मतदार असून २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चौघुले यांना ५८ हजार ८५५ मते मिळाली होती. मात्र, या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असतानाही लोकसभा निवडणुकीमध्ये सुरेश म्हात्रे यांना येथून लाखभर तर, कपिल पाटील यांना केवळ ४७ हजार ८७८ मते मिळाली होती. परंतु, चौघुले यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार, हे अद्याप ठरले नाही. कॉँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघ कॉँग्रेसच्या हातातून गेल्यानंतर निदान येथून कॉँग्रेसला उमेदवारी द्या, अशी विनवणी कॉँग्रेस पदाधिकारी करत आहेत. भिवंडी पश्चिममध्ये कॉँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची यादी लांबलचक असून माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, कॉँग्रेसचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे आदींचा समावेश आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केल्याने आघाडीमध्ये पेच वाढला आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेही या मतदारसंघात निवडणूक लढवणार असून येथून मनसेकडून मनोज गुळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अन्य शहरांमध्ये काही प्रमाणात पायाभूत सुविधांबरोबर विकासाची कामे झाली असली तरी भिवंडीतील चित्र वेगळे आहे. या ठिकाणी पावलागणिक समस्या दिसून येत असल्याने जनता खूपच त्रस्त आहेत. मतदार यंदा विधानसभेमध्ये कोणाला संधी देणार, याकडे लक्ष लागले आहे.

उमेदवारीवरून आघाडीत धुसफूस
भिवंडी पूर्व

मागील दोन निवडणुकीमध्ये या मतदारसंघात अटीतटीची लढत पाहावयास मिळाली. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे रईस शेख येथील विद्यमान आमदार असून २०१९ मधील निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेचे रूपेश म्हात्रे यांचा अवघ्या १ हजार ३१४ मतांनी पराभव केला होता. सध्या या मतदारसंघामध्ये ३ लाख ६९ हजारांच्या आसपास मतदार आहेत. अपेक्षेप्रमाणे शेख पुन्हा या मतदारसंघातून लढणार असले तरी त्यांच्याविरुद्ध महायुतीचा उमेदवार कोण असणार, याविषयी निश्चिती झाली नाही. या मतदारसंघातून भाजपचे भिवंडी पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख आणि माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून (उबाठा) माजी आमदार रूपेश म्हात्रे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेचा हा हक्काचा मतदारसंघ असल्याचा दावा म्हात्रे यांच्याकडून करण्यात आल्याने उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. म्हात्रे २०१४ मध्ये निवडून आले होते. जर, ही जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला न मिळाल्यास म्हात्रे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
Bhosari Vidhan Sabha: बदल की हॅट्ट्रिक होणार? भाजपच्या महेश लांडगेंसमोर महाविकास आघाडीचे तगडे आव्हान
बंडखोरीचे पडसाद उमटण्याची भीती
कल्याण पश्चिम

जवळपास ४ लाख ३४ हजारांहून जास्त मतदार असलेल्या या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे विश्वनाथ भोईर आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भोईर यांना ६५ हजार ४८६ मते मिळाली होती. त्यावेळी मनसेच्या उमेदवाराने बऱ्यापैकी मते घेतली होती. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणारे भोईर यांना पुन्हा पक्षाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. शहरप्रमुख रवी पाटील यांनाही पक्षाकडून उमेदवारीचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे. मात्र, कल्याण पूर्वेत शिवसेनेकडून बंडखोरी झाल्यास त्याचे पडसाद कल्याण पश्चिमेत उमटण्याचा इशारा भाजपने यापूर्वीच दिला आहे. तर, २००९ मध्ये मनसेतून विजयी झालेले प्रकाश भोईर यांच्यासह उल्हास भोईर, कस्तुरी देसाई, उर्मिला तांबे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेसह (उबाठा) काँग्रेसमधूनही या मतदारसंघावर दावा होत आहे.
आव्हाड आदित्य ठाकरेंपेक्षाही श्रीमंत; ठाण्यातील उमेदवार कोट्यधीश, कोणाकडे किती संपत्ती?
कथोरे-पाटील वादाचा फायदा कुणाला?
मुरबाड

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कथोरे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला होता. त्यांना १ लाख ७४ हजार मते मिळाली होती. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले कथोरे यांनी २०१४मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवर्षी माजी खासदार कपिल पाटील हेही राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झाल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजपची तादक वाढली असली तरी या दोन नेत्यांमधील अंतर्गत वाद आजही कायम आहे. हा वाद अनेकदा उफाळून येत असून दोन्ही नेते अप्रत्यक्षपणे नाव न घेता एकमेकांवर टीका करत असतात. विधानसभा निवडणुकीमध्ये पाटील हे कथोरे यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार का, असा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पाटील यांना मुरबाडमधून १ लाख ६ हजार ३६९ मते मिळाली होती. अपेक्षेप्रमाणे कमी मते मिळाल्याने पाटील नाराज असल्याचे बोलले जाते. या मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये धुसपूस वाढली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी तुतारी फुंकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार यांना राष्ट्रवादीकडून या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे बदलापूरचे राष्ट्रवादीचे (शप) शहराध्यक्ष शैलेश वडनेरे नाराज असून ते बंडखोरीची भाषा बोलू लागले आहेत. वडनेरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा तसेच, अपक्ष निवडणूक लढण्याचा इशारा दिल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मतदारसंघात संगिता चेंदवणकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.