Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nana Patole Letter To Uddhav Thackeray: जागावाटपाचा घोळ सुरू ठेवण्याची काँग्रेसची परंपरा कायम असून, त्याची सवय नसल्याने शिवसेनेने (उबाठा) थेट उमेदवार यादीच जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पत्र लिहिले.
हायलाइट्स:
- शिवसेनेच्या (उबाठा) परस्पर घोषणेमुळे नाराजी
- विदर्भ, मुंबईतील १२ जागांची काँग्रेसची मागणी
- तोडगा निघत नसल्याचे ठाकरेंचीही ताठर भूमिका
लोकसभा निवडणुकीला अगदी सहज झालेले महाविकास आघाडीचे जागावाटप विधानसभेत मात्र गेल्या महिन्याभरापासून अडथळ्यांची शर्यत पार करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांत उभी फूट पडली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस हाच राज्यातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचा निर्वाळा दिला असल्याचे काँग्रेसच्या सर्व मोठ्या नेत्यांचे म्हणणे होते. मात्र, जर आमची शक्ती कमी झाली आहे, तर आमच्याशी आघाडीच का करता, असा प्रतिप्रश्न शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) पक्षांतील नेते करीत होते. त्यातही शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला काँग्रेसच्या कार्यपद्धतीची नीट माहिती असल्याने त्यांनी याबाबत कोणतीही फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जागावाटपाबाबत काँग्रेसी कार्यपद्धतीची माहिती नसलेले शिवसेनेचे नेते प्रचंड कंटाळले आहेत. जागावाटपाचा घोळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सुरू राहतो की काय, या भितीने त्यांनी आपली पहिली यादीही जाहीर केली.
राहुल नार्वेकरांपेक्षा आशिष शेलार श्रीमंत, पाच वर्षांत संपत्तीत किती वाढ? जाणून घ्या
या यादीत जाहीर केलेल्या काही जागांवर काँग्रेस दावा सांगत आहे. काही जागांसाठी नाना पटोले, तर काही जागांबाबत वर्षा गायकवाड अस्वस्थ झाल्या असून, त्यांनी दिल्ली दरबारी दाद मागितली आहे. दुसरीकडे, ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न वर्षा गायकवाड, अस्लम शेख आणि सुनील केदार या काँग्रेसच्या नेत्यांनी करून पाहिला. मात्र, काँग्रेस नेत्यांची ही शिष्टाई कामी आली नसल्याचे समोर आले. नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात मुंबईसह राज्यातील १२ जागांवर काँग्रेसचा दावा असल्याचे म्हटले आहे. यात मुंबईतील भायखळा, वर्सोवा, कुर्ला, वडाळा, विदर्भातील रामटेक, बल्लारपूर, नागपूर दक्षिण, वणी, भद्रावती-वरेरा आदी मतदारसंघांचा समावेश असल्याचे समजते. शिवसेनेने परस्पर जागा जाहीर केल्याबद्दल पटोले यांनी या पत्रात नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या जागा त्यांना सोडणे शक्यच नसेल तर इतर काही जागा आमच्यासाठी सोडाव्यात, अशीही मागणी पटोले यांनी केली आहे. पटोले यांच्या या पत्रामुळे उद्धव ठाकरे नाराज झाल्याचे शिवसेना नेत्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता याप्रकरणी काय निर्णय घेतला जातो, याबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Chhagan Bhujbal: सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच; भुजबळांकडून थेट अजित पवारांचे उदाहरण
गेल्या काही दिवसांपासून जागावाटपासाठी काँग्रेस नेत्यांनी ‘मातोश्री’वर धाव घेतली होती. पण, आता या पत्रानंतर ‘मातोश्री’वर चर्चेसाठी प्रवेश देऊ नका, असे आदेश ‘मातोश्री’वरून देण्यात आल्याचे समजते. या सगळ्याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीवर होईल की काय, भीतीने काँग्रेस व ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनुभवी नेतेही चिंताग्रस्त बनले आहेत.
‘सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच’
नाशिक : मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा देऊन नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ‘राजकारणात असलेल्या सर्वच पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे, अशी टिप्पणी केली. शरद पवारांचा पुतण्या, गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या असे दाखलेही त्यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भुजबळांनी स्वपक्षाचे अध्यक्ष अजित पवारांचाही उल्लेख केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण, भाईसाठी केलं…
‘राष्ट्रवादीत दहा टक्के जागा अल्पसंख्यकांना’
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभा निवडणुकीत दहा टक्के जागा अल्पसंख्याक उमेदवारांना देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत दिली. पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची पहिली ३८ आणि आज ७ जणांची यादी जाहीर झाली आहे. आणखी काही जागांबाबत आमची दिल्लीत चर्चा सुरू आहे. महायुतीत आम्ही एकत्र असलो तरी विचारधारा सोडली नाही, असे अजित पवार म्हणाले.
फडणवीसांकडून अर्ज दाखल
मुंबई/नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. फडणवीस हे सलग सहाव्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, मनसेचे बाळा नांदगावकर आदी नेत्यांनीही शुक्रवारी अर्ज दाखल केले.