Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गडचिरोलीत भाजपने भाकरी फिरवली, सलग दोनदा निवडून आलेल्या आमदाराला डच्चू; ‘या’ तरुण डॉक्टरला संधी

4

Edited byकरिश्मा भुर्के | Authored by महेश गुंडेटीवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Oct 2024, 9:27 pm

Gadchiroli Vidhan Sabha Candidate : गडचिरोलीमध्ये भाजपने भाकरी फिरवत सलग दोन वेळा निवडून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी नाकारली असून दुसऱ्या तरुण डॉक्टरला उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महेश गुंडेट्टीवार, गडचिरोली : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी ९९ उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. गडचिरोलीसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या दुसऱ्या यादीत भाजपने भाकरी फिरवली असून सलग दोनदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांना डच्चू देत दुसऱ्या एका तरुण डॉक्टरला संधी दिली आहे.

मुंबई, दिल्ली वारी करुनही आमदार डॉ. देवराव होळी यांना तिकीट नाही

विशेष म्हणजे भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ९९ उमेदवारांमध्ये गडचिरोलीचे विद्यमान आमदार डॉ देवराव होळी यांचं नाव नसल्याने ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी तिकीटासाठी थेट मुंबई, दिल्लीची वारी केली. मात्र, त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी प्रेस क्लब हॉलमध्ये महायुती मधील शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन डॉ. होळी यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता असल्याने आम्ही त्यांच्या उमेदवारासाठी आग्रही असल्याचं सांगितले होते.
MNS Candidate : राज ठाकरेंनी विधानसभेच्या रिंगणात आतापर्यंत उतरवले ८५ शिलेदार, पाचव्या यादीत पाहा कोणाला दिली संधी?

डॉ. देवराव होळी यांना भाजपकडून डच्चू

गडचिरोली विधानसभेत भाजपमधील अंतर्गत कलाहाचा नवा अंक २४ ऑक्टोबरला पाहायला मिळाला होता. भाजपची दुसरी यादी अद्याप जाहीर झाली नसतानाच आमदार डॉ. देवराव होळी आणि भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं. त्यामुळे या दोघांच्या वादात भाजप नेमका कोणाला उमेदवारी देईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. अखेर दोनदा सलग आमदार राहिलेले डॉ. देवराव होळी यांना भाजपने डच्चू देत भाकरी फिरवली आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे ऐन निवडणूक रणधुमाळीत भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे.
उबाठा गटाचे सामुहिक राजीनामे ना मंजूर, निष्ठावंतांनी एकत्र येऊन गद्दार पोपटाचा डोळा फोडा मातोश्रीवरुन आदेश

कोण आहेत डॉ. मिलिंद नरोटे?

डॉ. मिलिंद नरोटे हे मूळचे चामोर्शी तालुक्यातील असून त्यांचा गडचिरोली शहरात वैद्यकीय व्यवसाय आहे. त्यांनी वैद्यकीय व्यवसायासोबतच स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यात सुरुवात केली होती. आरोग्य क्षेत्रात काम करताना त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. यातून राजकीय क्षेत्रात काम करण्याचा मनोदय वेळोवेळी बोलून दाखवत गडचिरोली मतदार संघात जनसंपर्कास सुरुवात केली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. ते संघ परिवाराच्या अतिशय जवळचे मानले जातात.
भाजप स्टार प्रचारक महाराष्ट्र गाजवणार; पंतप्रधान, ७ मुख्यमंत्री, डझनभर आजी-माजी केंद्रीय मंत्री उतरणार

गडचिरोलीत भाजपने भाकरी फिरवली, सलग दोनदा निवडून आलेल्या आमदाराला डच्चू; ‘या’ तरुण डॉक्टरला संधी

लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचं नाव समोर आलं होतं. विधानसभेसाठी विद्यमान आमदार डॉ. होळी यांच्यासोबत त्यांची तिकिटासाठी चुरस होती. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला २१ हजारांची पिछाडी होती. आता डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासमोर ही पिछाडी भरून काढण्याचं आव्हान राहणार आहे. विशेष म्हणजे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असून या विधानसभा क्षेत्रात डॉक्टरांच्या अवतीभोवतीच राजकारण चालत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या तरुण डॉक्टरांना उमेदवारी मिळाल्याने आता त्यांना मतदार संधी देतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.