Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तिरंगी लढतीत ठरणार ठाणेदार; संजय केळकर करणार का हॅटट्रिक, ठाणेकरांचं मत कुणाला?

10

Thane Vidhan Sabha: ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिकेमुळेच यंदा ही निवडणूक केळकर यांना जड जाणार अशी चर्चा एकीकडे सुरू आहे. मात्र खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस केळकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ठाण्यात आल्याने आता असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना कामाला लागावे लागणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
thane election1

विनित जांगळे, ठाणे : एकीकडे आजी आमदार तर दुसरीकडे माजी आमदार आणि या लढतीत ‘भावी आमदार’ म्हणून मैदानात उतरलेला उमेदवार, अशी स्थिती सध्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाची झाली आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विद्यमान भाजप आमदार संजय केळकर गेल्या दोन टर्मपासून करत आहेत. त्यांच्यासमोर या मतदारसंघाचे माजी आमदार राजन विचारे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रिंगणात उतरवले आहे. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत केळकर यांना झुंज देणारे मनसेचे अविनाश जाधव यंदा पुन्हा एकदा विजयासाठी प्रयत्नशील आहेत. अशा या तिरंगी लढतीनंतरच या मतदारसंघाचा ठाणेदार निश्चित होणार आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे विधानसभेवर २०१४मध्ये कमळ फुलले. सलग दोनवेळा भाजप आमदार संजय केळकर या मतदारसंघातून निवडून आले. पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत हॅट्रिकसाठी उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात टाकली. मात्र भाजपच्या माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची मोठी फळी येथून तिकिटासाठी इच्छुक होती. ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिकेमुळेच यंदा ही निवडणूक केळकर यांना जड जाणार अशी चर्चा एकीकडे सुरू आहे. मात्र खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस केळकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ठाण्यात आल्याने आता असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना कामाला लागावे लागणार आहे. दुसरीकडे शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी सुरुवातीपासूनच केळकर यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध दर्शवत बंडाचे निशाण फडकावले होते. त्यामुळे केळकर कंबर कसून मैदानात उतरले आहेत.

मराठी, गुजराती, जैन, मुस्लिम अशा संमिश्र लोकवस्तीच्या या मतदारसंघात ३ लाख ७४ हजार १५३ मतदार आहेत. यामध्ये जुन्या ठाण्यातील जीर्ण इमारती, सोसायटी, चाळींपासून ते ढोकाळी, मानपाडा, ब्रह्मांड येथील उच्चभ्रू टॉवरमधील वर्गाचा समावेश आहे. तसेच भूमिपुत्र आगरी व कोळी समाजाची राबोडी, बाळकूम, महागिरी, कोलशेत पट्ट्यात वस्ती आहे. राबोडी व महागिरीत मुस्लिम समाज वास्तव्याला आहे. प्रत्येक समाज घटकाचे विविध प्रश्न असून गेल्या दहा वर्षांत या घटकांसाठी आमदार केळकर उभे राहिल्याचे चित्र मांडले जात असतानाच त्यांनी या मतदारसंघात नेमके काय केले, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातो.
भाजपचे पराग शहा ठरले राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार; संपत्ती ५ वर्षांत दहापट वाढ, एकूण संपत्ती किती?
शिवसेनेचा हा पारंपरिक बालेकिल्ला असलेला मतदारसंघ २०१४ मध्ये केळकर यांनी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचा १२ हजार ५८८ मतांनी पराभव करत भेदला. त्यानंतर २०१९मध्ये संजय केळकर यांनी १९ हजार ४२४ मतांनी धुव्वा उडवला होता. आता पुलाखालून बरेच पाणीही वाहून गेले आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना ४८ हजार ०६२ इतके मताधिक्य होते. या निवडणुकीत म्हस्के यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार, माजी खासदार राजन विचारे ७८ हजार ३६९ यांनी ठाणे शहरमधून मिळवली होती. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजन विचारे यांना पुन्हा संधी दिली आहे. विचारे यांनी २००९मध्ये येथे भगवा फडकवला असल्याने त्यांचा करिष्मा कामी येतो का, हे पाहावे लागणार आहे. गेल्या दोन टर्मपासून या मतदारसंघात पारंपरिक शिवसैनिकांना त्यांचा हक्काचा उमेदवारच न मिळाल्याने या मतांची मोट विचारे यांनी स्वतःकडे वळवल्यास येथून धक्कादायक निकालाची अपेक्षा आहे. यासोबत या शिवसैनिकांनी महायुतीधर्म न पाळल्यास विचारे यांचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! पश्चिम रेल्वेचा नवा नियम, आता ट्रेनमधून अधिक सामान नेल्यास होणार कारवाई
या आजी-माजी आमदारांच्या लढाईत या मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून विविध आंदोलनांच्या माध्यमातून चर्चेत राहिलेल्या अविनाश जाधव यांचाही कस लागणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्याने कार्यकर्त्यांना स्फुरण चढले आहे. जाधव यांची ही प्रतिमा तरुण मतदारांवर छाप पाडणारी असली तरी शेवटच्या घटकापर्यंत निवडणूक यंत्रणा राबवण्याची मनसैनिकांना नितांत गरज असल्याने तसे झाल्यास जाधव यांचा दहा वर्षांचा ‘भावी’ प्रवास हा विजयश्री खेचून आणण्यात चमत्कार घडवू शकतो.
चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्पन्न २४ लाखांनी वाढले; पत्नीचेही उत्पन्न साडेसहा कोटींच्यावर, एकूण संपत्ती किती?
समस्यांची जंत्री
जुन्या ठाण्यातील इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न, वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, पार्किंगचा अभाव या प्रमुख समस्या या मतदारसंघात भेडसावतात. तर मतदारसंघातील नव्या लोकवस्तीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न पेटला आहे. भूमिपुत्रांचे कोळीवाडे, गावठाण यांचा प्रश्नही येथे उग्र झाला आहे.

मतदारसंख्या
एकूण : ३,७४,१५३
पुरुष : १,९३,०९९
महिला : १,८१,०४७
तृतीयपंथी : ७

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.