Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sharad Pawar at Ahilyanagar Highlights from Vidhan Sabha Election : ‘केंद्रातील सरकार चालविण्यासाठी चारशे जागांची आवश्यकता नसते. त्यापेक्षा कमी संख्येतही ते चालविता येते. तरीही ही घोषणा देण्यामागे त्यांच्याच काही खासदारांकडून नेमका हेतू उघड झाला.’ असे पवार म्हणाले आहेत.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारासाठी पवारांनी शेवगावमध्ये रविवारी दुपारी प्रचार सभा घेतली. उमेदवार ढाकणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने ‘चारशे पार’चा नारा दिला होता. केंद्रातील सरकार चालविण्यासाठी चारशे जागांची आवश्यकता नसते. त्यापेक्षा कमी संख्येतही ते चालविता येते. तरीही ही घोषणा देण्यामागे त्यांच्याच काही खासदारांकडून नेमका हेतू उघड झाला. आम्हाला राज्यघटना बदलायची आहे, त्यासाठी चारशेपेक्षा जास्त खासदार हवेत, असे त्यांच्या एका मंत्र्याने आणि दोन खासदारांनी जाहीरपणे सांगितले होते. हा डाव ओळखल्यानंतर आम्ही इंडिया आघाडीची स्थापना केली. राज्य घटना बदलण्यास तीव्र विरोध करून आम्ही लोकांमध्ये आलो. महाराष्ट्रातील लोकांनाही हा मुद्दा पटला. त्यामुळे त्यांनी आम्हाला मते दिली. राज्यातील ४८ पैकी ३१ खासदार आमच्या आघाडीचे निवडून आले. भाजपला देशातील मतदारांनी नाकारले आहे. मात्र चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांनी मदत केल्याने भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले,’ असेही पवार यांनी सांगितले.
जयंत पाटील गरजले! ‘ती माणसे खूप हुशार, जोड्या लावायला आणि तोडायला;’ पाहा कोणाकडे निशाणा
पवार म्हणाले, ‘आता राज्यातील विधानसभा निवडणुकीत लोकांनी पुन्हा विचारपूर्वक मतदान करण्याची वेळ आली आहे. येथील सामान्य माणूस आणि शेतकरी वाचवायचा असेल तर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे. मी केंद्रीय कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांची गरज ओळखून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. आता पुन्हा एकदा अशी कर्जमाफी देण्याची वेळ आली आहे. आम्ही ती देणार आहोत. आपल्या राज्यात महिलांची प्रतिष्ठा हे वैशिष्टय आहे. मात्र, गेल्या ८ महिन्यात राज्यात ९०० पेक्षा जास्त महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. शिवछत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात महिलांचा असा अपमान सहन करण्यासारखा नाही. त्यावर भाजपच्या हातातील सत्ता काढून घेणे हाच उपाय आहे. यासाठी नगर जिल्ह्यानेही मागे राहू नये. आपली जबाबदारी ओळखून सर्वांनी यासाठी मतदान करावे,’ असेही पवार म्हणाले.