Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. २७ : हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे.
ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन मालकाचा वाहन नोंदणी अर्ज करावा लागणार आहे. तसेच वाहन नोंदणी शुल्क व वाहन कराचा भरणा करून नोंदणी करता येणार आहे.
सद्यस्थितीत खाजगी वाहनांच्या नोंदणीप्रमाणेच हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी या सुविधेमुळे वाहन वितरकांकडे करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता हलकी मालवाहू वाहने, यापुढे परिवहन कार्यालयात नोंदणीसाठी आणण्याची आवश्यकता राहणार नाही व नोंदणीची प्रक्रिया विनासायास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहन धारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. वाहन वितरकांस काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा.
तरी, सर्व नागरिकांनी व संबंधित वाहन वितरकांनी याची नोंद घेऊन, त्याप्रमाणे कार्यवाही करावी व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.
0000
नीलेश तायडे/विसंअ/