Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नागपूर, दि. १९ : विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून विधानपरिषदेला वेगळी परंपरा आहे. या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस आहे. सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण लोकहितासाठी खर्ची पडेल असे जबाबदारीपूर्ण वर्तन आपले राहिल, अशी काळजी घेऊया, अशा शब्दांत विधानपरिषदेचे नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.
विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाल्यानंतर अभिनंदनपर प्रस्तावावर प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री पंकजा मुंडे, सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, ॲड. अनिल परब यांनी निवडीवर भावना व्यक्त केल्या.
सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, जनतेच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण उपयोगात आणायचा आहे. सत्ताधारी आणि विरोधी ही संसदीय लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत आणि त्या रथात जनताजनार्दनाची अभिव्यक्ती विराजमान आहे. या रथाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ. सदस्यांचा सभागृह कामकाजातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सभागृहात बसलेले असताना समाजाचा कुठला प्रश्न नेमक्या आयुधामार्फत मांडून आपण जनतेला न्याय देऊ शकू यादृष्टीने सतत तयारी केली पाहिजे. आपले सभागृह ज्येष्ठांचे सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते मात्र अलिकडच्या काळात तरूण सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ते वयोमानपरत्वे तरूण होत चालले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विधीमंडळाचे कामकाज प्रभावी होण्यासाठी चतु:सूत्रीचा कार्यक्रम अंमलात आणणार आहे. यामध्ये प्रश्नोत्तराचा तास महत्त्वाचा असून हा तास विनाव्यत्यय पार पडावा. समित्यांचे गठन, समिती प्रमुखांना उचित मार्गदर्शन, सभागृहाला अहवाल सादर होणे ही कार्यपद्धती आणखी गतिमान आणि मजबूत करण्यात येईल. कायदा निर्मिती प्रक्रियेत सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा. तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा आणि मागण्यांवरील चर्चा यांना पुरेसा अवधी मिळणे, सदस्यांना आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मार्गदर्शन आणि निधी मिळणे यादृष्टीने आपण उत्तम कार्य करणे या चतु:सूत्रीचा अवलंब कामकाजात करणार आहे, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
माजी सभापती ना.स.फरांदे यांच्या विचाराचा वारसा चालवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे हे शिक्षक आहेत. त्यामुळे ते सभागृहाचे कामकाज अतिशय शिस्तीने व संवेदनशीलपणे चालवतील. शिक्षक हा जन्मभर शिक्षक असतो. तो शिकतही असतो. त्यामुळे प्रा. शिंदे पदावर आल्यावर अनेक चांगले पायंडे पाडतील व पिठासीन अधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील असा विश्वास आहे.
माजी सभापती प्रा. ना.स. फरांदे यांच्या विचारांचा वारसा त्यांच्याच अहिल्यानगर जिल्ह्याचे असलेले प्रा. शिंदे पुढे नेतील. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षात त्यांचे वंशज असलेले प्रा. राम शिंदे हे विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या वरिष्ठ पदावर बसत आहेत, हे एक प्रकारे पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना वाहिलेली सुमनांजली आहे. सरपंचपदापासून ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रा. शिंदे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवाचा फायदा त्यांना सभागृह चालविताना नक्कीच उपयोगी येईल. ऐतिहासिक चौंडी गावच्या सरपंचपदी असताना त्यांनी केलेले काम राज्यात नावजले गेले. त्याचबरोबर अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांचा प्रभाव आहे. दोन्ही सभागृहाच्या पिठासीन अधिकाऱ्यांमध्ये विधानपरिषदेच्या सभापती पदाचा मान मोठा आहे. अतिशय संवेदनशील व्यक्ती पदावर बसली आहे. एक उत्तम सभापती म्हणून सभागृहात त्यांचे नाव घेतले जाईल. यामाध्यमातून राज्याच्या 14 कोटी जनतेला न्याय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा प्रा.शिंदे चालवतील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षात प्रा. राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाली ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या नावात राम आहे, त्यामुळेच ते रामासारखेच न्यायप्रिय असतील. सत्ताधारी किंवा विरोधक कुणावरही ते अन्याय होवू देणार नाहीत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायाचे राज्य कसे असावे, प्रजेचे कल्याण कसे करावे, याचा वस्तुपाठ घालून दिला. प्रा. शिंदे हे हेच संस्कार घेऊन समाजकारणात उतरले आहेत. त्यांची सभापतीपदी निवड ही सर्वार्थांने अचूक आहे. सभापती म्हणून त्यांच्यातील नेतृत्व, संयम, अभ्यासू वृत्ती आणि सभागृह चालविण्याची हातोटी हे गुण दिसतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रा. शिंदे यांनी राज्यमंत्री व नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले. शांत संयमी नेतृत्व म्हणून प्रा. शिंदे यांनी ओळख आहे. मात्र, ते जनतेच्या प्रश्नांवर कायम आक्रमक असतात, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सभापतीपदाला न्याय देऊन गौरव वाढवतील – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीचे आसन अत्यंत मानाचे, सन्मानाचे व तितकेच जबाबदारीचे आहे. अनेक नेत्यांनी हे पद भूषविले आहे. प्रा. शिंदेही या पदाला योग्य न्याय देऊन पदाचा गौरव वाढवतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची न्यायप्रियता, त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा, विचारांचा वारसा खऱ्या अर्थान पुढे नेण्याचा, राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनात चांगला बदल घडवून आणण्याचे कार्य या सभापतीपदाच्या माध्यमातून प्रा. शिंदे करतील असा विश्वास आहे.
शेती-मातीत, गाव-खेड्यात वाढलेला एका शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा मुलगा आज विधीमंडळाच्या सर्वोच्च साभागृहाच्या प्रमुखपदी बसला आहे. हे खऱ्या अर्थान लोकशाहीचे मोठेपण आहे, सौंदर्य आहे. आपल्या देशाच्या संविधानाची महानता, सुंदरता आहे. प्रा. शिंदे यांच्या रुपानं विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती तरुण आहेत. अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद सांभळले आहे. त्यामुळे प्रा. शिंदे यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रा. शिंदे हे त्यांच्या प्रगल्भ आणि संयमी नेतृत्वामुळे या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडतील. प्रा. शिंदे यांनी सभापतीपदाचा उपयोग करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या त्यांच्या कार्यकाळाला नवा आयाम द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वरिष्ठ सभागृहाची परंपरा जपताना योग्य सहकार्य करू – अंबादास दानवे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी वर्षात प्रा. शिंदे यांना मिळालेला मान बहुमूल्य आहे. प्रा. शिंदे यांनी संघर्ष करत इथपर्यंतचा प्रवास केला आहे. मंत्री असताना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. आताही ते चांगले काम करतील. वरिष्ठ सभागृहाची परंपरा जपत असताना त्यांना विरोधी पक्षाकडून योग्य सहकार्य मिळेल.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/