Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे, दि.०३ :-‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी जगाला आवाज दाखवला,’ अशा शब्दांमध्ये गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी भीमसेन जोशी यांना आदरांजली अर्पण केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (पिफ २०२२) आज पटकथाकार जावेद अख्तर आणि शास्त्रीय गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी अख्तर बोलत होते.
‘पिफ’चे संचालक ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे फिल्म फाउंडेशनचे सरचिटणीस रवी गुप्ता, विश्वस्त सतीश आळेकर, चित्रपट निवड समितीचे सदस्य समर नखाते, अभिजित रणदिवे यावेळी उपस्थित होते.
अख्तर म्हणाले, “आवाज कसा असू शकतो, हे भीमसेन जोशी यांनी दाखवले. आवाजाला त्यांनी मूर्त स्वरूपात जगाला दाखवले. आवाज जवळ येतो, लांब जातो. वर येतो, खाली जातो. आवाज सादर होतो. भीमसेन जोशी यांचे गाणे ऐकताना आवाजाचा वापर विलक्षण कसा असू शकतो, याचा अनुभव यायचा.” ते म्हणाले की कदाचित त्यांचे बोलणे हे अतिशयोक्तीचे वाटेल, पण ज्यांनी त्यांच्या मैफिलींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्यांना त्याचा प्रत्यय आलेला आहे.
लता मंगेशकर यांच्याविषयी बोलताना अख्तर म्हणाले, की भारतीय चित्रपटातील गीते लोकांचे तत्त्वज्ञान सांगणारी होती. भारतीय परंपरेमध्ये गाणी होती तीच परंपरा चित्रपट गीतांनी पुढे नेली. त्यामध्ये लता मंगेशकर यांचे स्थान मोठे होते. जगातील सर्वांत जास्त गाणी त्यांची आहेत. भारतीय चित्रपटाच्या त्या अविभाज्य भाग आहेत. लता मंगेशकर गायच्या तेंव्हा या कविता आणि गीताचा अर्थ ध्वनित होताना जाणवायचा.
पुणे आणि पुणे चित्रपट बोलताना अख्तर म्हणाले, “पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. ज्ञानाचे शहर आहे. सिनेमाच्या विकासात पुण्याचा मोठा सहभाग आहे. पुण्याने खूप महत्त्वाचे चित्रपट तयार केले. इथला प्रेक्षक खूप प्रगल्भ आहे. संस्कृती आणि कला महाराष्ट्र आणि पुण्यात रोमारोमांत भरली आहे. हे या पुणे चित्रपट महोत्सवातून दिसते. वेगवेगळ्या देशांमध्ये चित्रपट तयार होतात. वेगेवेगळे लोक आणि समान लोक अशा दोन विरोधाभासाच्या गोष्टी हे चित्रपट आपल्याला शिकवत असतात. हे या चित्रपट महोत्सवातून दिसते. हा चित्रपट महोत्सव प्रत्येकवर्षी मोठा होत असून, हॉलिवूडच्या बाहेर मोठा सिनेमा आहे, हे या महोत्सवातून दिसते.”
“भारतीय व्यावसायिक चित्रपटामध्येही सामाजिक राजकीय अर्थ असतो. समकालीन मूल्यांना पुढे घेऊन जाणारा हा नायक असतो. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात हा आशय येताना दिसतो. चित्रपट हे स्वप्नांसारखे असतात. आणि ती स्वप्ने लोकांची असतात. आणि ती भारतीय व्यावसायिक चित्रपटांमधून दिसतात. आता मोठ्या प्रमाणावर लोक मध्यमवर्गात आले आहेत. त्यांचा प्रभाव चित्रपटावर पडत आहे,” असेही अख्तर म्हणाले. तसेच भारतीय गीतकारांचं काम इतकं अद्वितीय आहे की त्यांना ऑस्कर, नोबेल सारखे पुरस्कार मिळावेत अशा शब्दांत त्यांनी गीतकारांचा गौरव केला आणि साहीर लुधियानवी, शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी आदी गीतकारांचा आवर्जून उल्लेख केला.
पंडित सत्यशील देशपांडे म्हणाले, “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना जग हे भारताची ओळख म्हणून जाणते आणि भारत त्यांना स्वतःचा अभिमान मानतो. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे एकमेव असे संगीत आहे, की ज्यात गायक ३ तास तीनही सप्तकांत गात असतो. मात्र त्याच्याकडे सामुग्री अल्प असते. अशा अतिशय अल्प सामुग्रीत सुरांना घेऊन जगाला स्तिमित करणारी प्रतिभा घेऊन पंडित भीमसेन जोशी गेल्या शतकात आले. त्यांनी कधी फ्युजन केले नाही. त्यांचा स्वर हा नेहमीच आश्वासक होता. प्रत्येकाला असे वाटायचे की ते आपल्याशीच बोलत आहे आणि आपल्यासाठीच गात आहेत. ते संगीताच्या प्रवासात श्रोत्यांना बरोबर घेऊन जायचे. त्यांनी विलक्षण स्वरनाट्य सादर केले. त्यांनी शब्दांचा अतिशय कमी आणि नेमका वापर केला. त्यांनी भक्तिसंगीताला शास्त्रीय संगीताचा आयाम दिला.”
प्रास्ताविक करताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “जगभरात भयानक परिस्थिती असतानाही यावर्षी ‘पिफ’मध्ये १५७८ चित्रपट आले. त्यातून निवडलेले ६५ देशांतून आलेले ११० चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. भारत साहिर लुधियानवी, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि सत्यजित रे यांची जन्मशताब्दी साजरी करीत आहे. त्यांच्याच कारकिर्दीला यावेळच्या ‘पिफ’मध्ये सलाम करण्यात येत असून, त्यावर आधारित थीम यावर्षी ‘पिफ’साठे निवडण्यात आली आहे.” यावेळी त्यांनी चित्रपट महोत्सवाची विस्तृत माहिती दिली.
यावेळी भारतरत्न लता मंगेशकर यांना चित्रफितीमधून श्रद्धांजली वाहण्यात आली. पंडित बिरजू महाराज यांना अभिनेत्री शर्वरी जमेनीस हिने नृत्यांतून आदरांजली अर्पण केली. यशवंत जाधव यांनी पोवाडा आणि डॉ. गणेश चंदनशिवे यांनी पारंपरिक गोंधळ सादर केला. अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांनी सोहळ्याचे निवेदन केले.
उद्घाटन सोहळ्यानंतर स्वित्झर्लंडच्या मानो खलील यांच्या ‘नेबर्स’ हा चित्रपट दाखवण्यात आला.